नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या माता रत्नेश्वरी देवीच्या गडावर नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विधिवत पूजाअर्चा, अभिषेक आणि घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. या महोत्सवासाठी रत्नेश्वरी गडावर आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांच्या स्वागतासाठी वडेपूरीकर सज्ज झाले आहेत.
नवरात्र उत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील विविध भागांतून भाविक गडावर येत असतात. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी व्यवस्थापनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनांची गैरसोय टाळण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांची गर्दी आणि भाविकांची वर्दळ लक्षात घेऊन चोख नियोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावेत, यासाठी मंदिर परिसरातील स्वच्छता आणि इतर आवश्यक बाबींचीही काळजी घेण्यात आली आहे.
उत्सव काळातील घटस्थापना, पूजाअर्चा, अभिषेक आणि महाआरती या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पाटील दळवे, सचिव साहेबराव झांबरे, विश्वस्त सदाशिव अंबुरे, सदाशिव स्वामी, दिलीपराव उर्फ माधवराव धर्माधिकारी बरबडेकर, जनार्दन मामीडवार, व्यंकटराव मुळे आणि जवळेकर देशमुख यांनी केले आहे.


