मुंबई , सतीश तोडासे (प्रतिनिधी) : भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारात कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक रोजगाराला प्राधान्य देण्याची मागणी CFTUI ने केली.
CFTUI चे प्रतिनिधी राजेश निंबाळकर यांनी ब्रिटनच्या ट्रेड युनियन काँग्रेसचे (TUC) प्रादेशिक सचिव कॉम्रेड डेव्ह पाईक यांची भेट घेतली. या वेळी ITUC–Asia Pacific चे डॉ. सय्यद पाशा उपस्थित होते. निंबाळकर यांनी ब्रिटिश ट्रेड मिशनकडे भारतीय असंघटित व कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. कामगारांना योग्य वेतन, रोजगाराची सुरक्षितता आणि प्रभावी सामाजिक सुरक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात आली. कार्यस्थळावरील आरोग्य व सुरक्षितता, लिंगसमानता आणि भेदभावापासून संरक्षण यांवरही भर देण्यात आला. भारत-ब्रिटन व्यापार करारातील कामगारविषयक तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज CFTUI ने अधोरेखित केली.
ई-श्रम नोंदणीसोबत असंघटित कामगारांना प्रत्यक्ष कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, असे निंबाळकर यांनी सांगितले. भारत आणि ब्रिटनमधील कामगार संघटनांनी सहकार्य वाढवून कामगारांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडावेत, असे आवाहन करण्यात आले. या भेटीत CFTUI तर्फे राजेश निंबाळकर, सुरेश पाटील, ॲड. विद्या पाटील आणि संभाजी दहाटोंडे सहभागी झाले.


