अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अहिल्यानगर शहरापासून पाथर्डी रस्त्यावर १५ किलोमीटर अंतरावर मेहेकरी हे छोटेसे गाव आहे. गावाच्या पूर्वेला अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सद्गुरु माध्यमिक विद्यालय आहे. विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरील विशाल गणेशाची मूर्ती येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
या गणपतीच्या प्रतिष्ठापनेची कहाणी मोठी रंजक आहे. आज ज्या ठिकाणी हे गणेश मंदिर आहे, तेथे ब्रिटिश काळात इंग्रज अधिकाऱ्यांचा तपासणी नाका होता. स्वातंत्र्यपूर्व काळात मेहेकरी येथे ब्रिटिशांची गांजा डेपो ही छोटीशी वसाहत होती. सुरक्षेच्या कारणास्तव ब्रिटिशांनी तिथे एक चौकी उभारली होती. स्वातंत्र्यानंतर पुढे १० जून १९६० रोजी या जागेवर सद्गुरु माध्यमिक विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या सुरक्षा चौकीचा वापर अडगळीचे सामान ठेवण्यासाठीची खोली म्हणून होऊ लागला. मेहेकरी गावात ‘भारती संप्रदायाचे’ मोठे प्रस्थ आहे. भक्ती-शक्तीचा सुरेख संगम घडावा, या हेतूने १९९२ मध्ये तत्कालीन मुख्याध्यापक श्री. भोईटे सर यांनी सदर ठिकाणी गणेश मंदिर उभारण्याचे ठरवले. शाळेतील कलाशिक्षक श्री. बेरड सर व श्री. शेकटकर सर यांच्याकडे गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सोपवण्यात आले. श्री. शेकटकर सर हे शिल्पकलेमध्ये निपुण होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने विशाल गणेशाची मूर्ती तयार केली.
परिसरातील दगड, विटा, वाळू, सिमेंट इत्यादी साहित्याचा वापर करून ही मूर्ती घडवण्यात आली. मूर्तीची उंची १२ फूट आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती चित्ताकर्षक असून ती रक्तवर्णी आहे. पुढील काळात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गोबरे सर व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री. चौधरी सर यांनी शाळेतील इतर शिक्षकांच्या सहकार्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. मंदिराला शिखर बांधण्यात आले. पोलीस चौकीचे रूपांतर गणेश मंदिरामध्ये झाले. गणेशाची मूर्ती रक्तवर्णी असल्याने ती भक्तांना आकर्षित करणारी आहे. तसेच मेहेकरी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान ठरली आहे. माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हे मंदिर असल्याने विद्यालयात येणारे सर्व आगंतुक, मान्यवर व संस्था पदाधिकारी गणपतीचे दर्शन घेऊनच विद्यालयात प्रवेश करतात.
गणपती देवता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची अधिपती समजली जाते. अशा या देवतेचा आशीर्वाद घेऊन सद्गुरु माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. प्रत्येक गणेश चतुर्थीला पंचक्रोशीतील भाविक भक्त नित्यनियमाने या ठिकाणी दर्शनाला येतात. शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचा दिवस गणेश दर्शनाने अतिशय आनंदात व प्रसन्न वातावरणात सुरू होतो. बुद्धीची देवता असणारा हा गणराया विद्यार्थ्यांना सदैव बुद्धिप्रामाण्यवादी राहण्याचा संदेश देत विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभा आहे.


