बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारकडून MESMA लागू

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतील सार्वजनिक बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अनुरक्षण कायदा (MESMA) लागू करत संपावर बंदी घातली आहे.
बेस्ट कर्मचारी संघटनांनी अनेक मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्यात यावा, कंत्राटीकरणाची प्रक्रिया थांबवावी तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर बेस्टच्या मालमत्तांचा पुनर्विकास करू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, संस्थेतील सुमारे १० हजार रिक्त पदे भरणे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी तातडीने अदा करणे, या मागण्याही संघटनांनी केल्या आहेत.
मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी बेस्ट बससेवा ही दैनंदिन प्रवासाची महत्त्वाची सुविधा मानली जाते. अशा परिस्थितीत बससेवा बंद पडल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सरकारने MESMA लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याअंतर्गत अत्यावश्यक सेवांमध्ये संप किंवा कामबंद आंदोलन करण्यास बंदी असते.
दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतरही कर्मचारी संघटना आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम राहणार की चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. या संपामुळे बससेवेवर किती परिणाम होतो आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पण केंद्राने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असली तरी भारतीय नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता नाही. इंधन दर कमी होणार का, या चर्चेला…

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ‘सारथी’ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण खर्च उचलणार

पुणे : परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) यांच्या परदेशी शिष्यवृत्ती…