नांदेड , रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड जिल्हा न्यायालय परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड जिल्हा अधिवक्ता संघ आणि ‘टीम आयुष्मान’ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायाधीश, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आयुष्मान व वय वंदना कार्ड काढण्याचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. अधिवक्ता संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड. यदुपत अर्धापूरकर यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन नांदेडचे जिल्हा व मुख्य न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायाधीश, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान १०० हून अधिक लाभार्थ्यांचे आयुष्मान व वय वंदना कार्ड यशस्वीरीत्या काढण्यात आले. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित राहिलेली कार्डे संबंधित प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘टीम आयुष्मान’चे सेवानिवृत्त अभियंता प्रकाश पत्तेवार, वामन गाजरे आणि श्रीमती पद्मजा अलुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांच्या वतीने टीम आयुष्मान नांदेडचे विशेष आभार मानण्यात आले. या उपक्रमामुळे न्यायालयीन अधिकारी, अधिवक्ता आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत झाली. या सामाजिक उपक्रमाचे न्यायालयीन वर्तुळातून समाधान व्यक्त करण्यात आले.


