‘नेत्रदान महादान’चा संदेश देत नांदेड शहरातून भव्य जनजागृती रॅली

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त लायन्स नेत्र रुग्णालयाचा उपक्रम; घोषवाक्यांनी शहर दुमदुमले, पथनाट्यातून प्रभावी जनजागृती

नांदेड, रविंद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : ‘राष्ट्रीय नेत्रदान जनजागृतीतून अंधत्वावर मात’ या संकल्पनेतून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आणि नंदीग्राम लायन्स ट्रस्ट, नांदेड संचलित लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने शहरातून भव्य नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘नेत्रदान—महादान’, ‘मृत्यूनंतरही डोळ्यांतून दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करा’ अशा घोषवाक्यांनी शहर दुमदुमून गेले. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जंगमवाडी येथील लायन्स नेत्र रुग्णालयापासून रॅलीला सुरुवात झाली. लायन्स प्रांत ३२३४ एच २ चे प्रथम उपप्रांतपाल लॉयन योगेशकुमार जायस्वाल यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी नागरिकांनी नेत्रदानासारख्या मानवतावादी उपक्रमात सहभागी होऊन ‘नेत्रदान—महादान’ या संदेशाला बळ द्यावे, असे आवाहन केले. रॅलीत नंदीग्राम नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष लॉयन राजेश लोटिया, सचिव लॉयन ॲड. प्रविण अग्रवाल, कोषाध्यक्ष लॉयन अरुणकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष लॉयन गंगाप्रसाद तोष्णीवाल, सहसचिव लॉयन शिरीष कासलीवाल यांच्यासह विविध लायन्स क्लबचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, नेत्र रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

जंगमवाडी येथून सुरू झालेली रॅली आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, हनुमान पेठ, महावीर चौक मार्गे जुना मोंढा टॉवर येथे पोहोचली. रॅलीदरम्यान सहभागींच्या हातातील नेत्रदान जनजागृतीचे फलक आणि घोषवाक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज आणि भीती दूर करून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

पथनाट्यातून नेत्रदानाचा प्रभावी संदेश

रॅलीदरम्यान महात्मा फुले पुतळा चौक आणि जुना मोंढा, नांदेड येथे लायन्स नेत्र रुग्णालय, जंगमवाडी तसेच सिडको येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या वतीने नेत्रदान जनजागृतीवर आधारित प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. मृत्यूनंतर नेत्रदान केल्याने दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊ शकतो, हा संवेदनशील संदेश पथनाट्यातून देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. नेत्रदानाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नेत्रदानासंदर्भातील गैरसमज व भीती दूर करणे आणि अधिकाधिक नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करणे, हा या जनजागृती अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. ‘मृत्यूनंतर आपले डोळे मातीत जाण्याऐवजी एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी,’ असा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

जुना मोंढा टॉवर येथे समारोप

रॅलीचा समारोप जुना मोंढा टॉवर येथे वजीराबाद वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष तिडके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सहकार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदान जनजागृतीचा संदेश शहरातील विविध भागांत पोहोचविण्यात ही रॅली यशस्वी ठरली. समारोपप्रसंगी लॉयन राजेश लोटिया यांनी उपस्थितांचे आभार मानले. रॅली यशस्वी करण्यासाठी जंगमवाडी व सिडको येथील डॉक्टर, कर्मचारी तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…