नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : पावसाने मोठी ओढ दिल्याने नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात खरीप पिके संकटात सापडली असून, दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने उच्चस्तरीय पाहणी करून दुष्काळ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी पुत्र संघर्ष समितीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. समितीच्या शिष्टमंडळाने नांदेड येथील नियोजन भवनात कृषिमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मुखेड तालुक्यात शासनाच्या नोंदीनुसार सुमारे ७७८.९० मिलिमीटर अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्यक्ष सुमारे ५७४ मिलिमीटर पाऊस झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि इतर खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. मुखेड तालुक्यात सोयाबीनचे ५४ हजार ५५२ हेक्टर, कापूस ८ हजार ९६७ हेक्टर, इतर खरीप पिके ७ हजार २५३ हेक्टर, मूग २ हजार ८६ हेक्टर आणि उडीद १ हजार ९३२ हेक्टर क्षेत्र असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यात गावनिहाय व पिकनिहाय ‘एक गाव, एक पंचनामा’ पद्धतीने नुकसान नोंदवावे, अशी मागणी करण्यात आली. पावसातील खंड, जमिनीतील ओलावा, पिकांची अवस्था, करपलेले क्षेत्र आणि संभाव्य उत्पादनघटीची वस्तुनिष्ठ नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील सुमारे ९ लाख ४६ हजार २०७ शेतकरी अर्जदार आणि ६ लाख १७ हजार ३२३ हेक्टर विमा क्षेत्राचा संदर्भ देत, प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने विमा नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पिक कापणी प्रयोग अथवा प्रक्रियात्मक कारणांमुळे नुकसानभरपाई रखडू नये, तसेच कर्ज पुनर्गठन, हप्ते पुनर्नियोजन, व्याजसवलत, इनपुट सबसिडी आणि अन्य शासकीय मदत तातडीने द्यावी, अशीही मागणी आहे. संभाव्य चारा व पाणीटंचाई लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याचे आवाहन समितीने केले. “केवळ प्रशासकीय आकडेवारीवर निर्णय न घेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी,” अशी भूमिका समितीने मांडली. यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे, गिरीधर पाटील केरूरकर, रमाकांत पाटील जाहूरकर, निळकंठ पाटील कोळनूरकर, अंकुश हावरगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


