अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. आगामी काळात दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू असून, जलसंपदा विभागाने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.
ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात सध्या पाणीसाठा उपलब्ध असला, तरी एल निनोच्या प्रभावामुळे वाढते तापमान आणि पाण्याच्या वापरामुळे साठ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नगर शहराला दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच शक्य तिथे पाण्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


