नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त पुणे व मुंबईतून नांदेडसाठी येणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दोन्ही शहरांतून नांदेडसाठी येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी किमान दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे व मुंबई येथे शिक्षण, नोकरी तसेच व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले नांदेडसह मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि कामगार दिवाळी सणासाठी आपल्या गावी परततात. मात्र, नियमित रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, आरक्षणासाठी प्रतीक्षा यादीही वाढत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही खासगी बस व ट्रॅव्हल्स चालकांकडून अवाजवी तिकीट दर आकारले जात असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी, कामगार तसेच नोकरदार वर्गावर आर्थिक भार पडत असून, प्रवाशांची होणारी ही पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी किशोर देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे ते नांदेड आणि मुंबई ते नांदेड या दोन्ही मार्गांवर येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी किमान दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू कराव्यात. तसेच, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नियमित रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डबे उपलब्ध करून द्यावेत आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींची चौकशी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवाळीच्या सणात नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा प्रवास करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही किशोर देशमुख यांनी केली आहे. याप्रसंगी निलेश कुंटूरकर, आदित्य शिरफुले, श्रीकांत राठोड, लक्ष्मण कल्याणकर, नवनाथ कपाटे, आसिफ खान, समद खान, श्याम कदम देशमुख आणि किरण मुत्तेपवार उपस्थित होते.


