ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अभिनय विश्वातील एक मोठे पर्व अस्तंगत

जबरदस्त अभिनय, प्रभावी संवादफेक आणि संवेदनशील मनाचा कलावंत काळाच्या पडद्याआड

आशिष औंढेकर (प्रमुख पश्चिम महाराष्ट्र) :

जबरदस्त अभिनय, प्रभावी संवादफेक आणि संवेदनशील मनाचा कलावंत आणि माणूसपण जपणारा माणूस, आपल्या सर्वांचा लाडके अभिनेते, नाना पाटेकर अचानक काळाच्या पडद्याआड गेले. ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक जाणिवेचे भान व माणूसपण जपणारे लोकप्रिय कलावंत नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गोवा येथे निधन झाले.

त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा एक असामान्य कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. १ जानेवारी १९५१ रोजी रायगड जिल्ह्यात मुरूड (जंजिरा) येथे जन्मलेल्या नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर होते. त्यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार, तर आई संजनाबाई पाटेकर. घरातील अशा कलात्मक वातावरणामुळे लहानपणापासूनच नानांच्या मनात कलेची आवड निर्माण झाली होती.

घरातील प्रचंड आर्थिक अडचणीमुळे त्यांना अत्यंत संघर्षमय जीवन जगावे लागले. त्यामुळे वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे त्यांनी शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनातच नाटकांशी त्यांचा जवळचा संबंध आला आणि पुढे हाच रंगभूमीचा प्रवास त्यांच्या अभिनय कारकिर्दीचा भक्कम पाया ठरला.

नानांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात प्रायोगिक रंगभूमीपासून केली. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘गवराई’ या नाटकातील त्यांची भूमिका खूप गाजली. प्रख्यात दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमीवर काम करताना त्यांच्या अभिनयातील क्षमता, अभिनयाची ताकद, आवाजातील कणखरता आणि नाटक किंवा चित्रपटातील व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरण्याची क्षमता विलक्षण प्रतिभेची होती. १९७८ मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला मिळेल ती भूमिका स्वीकारत संघर्ष करणाऱ्या नानांना ‘अंकुश’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. बेरोजगारीने त्रस्त युवकाची त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

यानंतर प्रतिघात, परिंदा, सलाम बॉम्बे, प्रहार, राजू बन गया जंटलमन, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, खामोशी, वजूद, पुरुष, टॅक्सी नंबर ९२११, राजनीती, अब तक छप्पन, गोलमाल अगेन अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगवेगळी रूपे रसिकांसमोर आणली. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडली. भालू, पक पक पकाक, देऊळ, नटसम्राट, आपला माणूस यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. गंभीर भूमिका असो, खलनायक असो, नायक असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा असो, नानांनी प्रत्येक भूमिकेला स्वतःची एक वेगळी ओळख करून न्याय दिला.

त्यांचा जबरदस्त आवाज, संवादफेक, देहबोली आणि डोळ्यांतून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद ही त्यांच्या अभिनयाची खासियत होती. त्यांच्या अनेक संवादांना त्यांनी अक्षरशः अजरामर केले. नानांचा एखादा संवाद कानावर पडला तरी त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे खरे गमक होते. चित्रपटांच्या जाहिराती लावण्यापासून ते भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्ष, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाने भरलेला होता. सिने इंडस्ट्रीमध्ये कोणताही गॉडफादर नसताना, केवळ आपल्या क्षमतेच्या व कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अभिनयविश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले.

नाना केवळ अभिनेते नव्हते, ते संवेदनशील माणूस आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी महाराष्ट्रात ‘नाम फाउंडेशन’ उभारून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. जलसंधारणासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले. पुरस्कारांमधून मिळालेली रक्कमही त्यांनी अनेकदा सामाजिक कार्यासाठी वापरली. अभिनयासोबतच नानांना रायफल शूटिंगचीही आवड होती. वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी या क्षेत्रात विशेष रस घेतला आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली.

त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीचा गौरव अनेक मान-सन्मानांनी झाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री, मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भारतीय प्रादेशिक सैन्यात त्यांना मानद लेफ्टनंट कर्नल पदही बहाल करण्यात आले होते. कधी स्पष्टवक्ता, कधी तत्त्वनिष्ठ, कधी रागीट तर कधी समाजातील सामान्य माणसाच्या वेदना आपल्या अभिनयातून मांडणारा हा कलावंत प्रत्येक भूमिकेशी एकजीव होत असे.

पडद्यावरचा नाना जितका प्रभावी होता, तितकाच पडद्यामागचा माणूसही संवेदनशील होता. नाना पाटेकर म्हणजे केवळ एक अभिनेते नव्हते, ते अभिनयाचे एक चालते-बोलते विद्यापीठ होते, असे म्हटले तर फारसे चुकीचे ठरवू नये. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बुलंद आवाज शांत झाला आहे. अभिनयाच्या विश्वातील एक तेजस्वी तारा मावळला असला, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका, त्यांचे संवाद, त्यांचा आवाज आणि त्यांच्या अभिनयाची विलक्षण जादू रसिकांच्या स्मरणात राहील, यात काहीच शंका नाही. नानांच्या जाण्याने भारतीय नाटक व चित्रपट क्षेत्रातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

ॐ शांती 🙏💐

— गिरीश वसेकर नांदेड सिटी, पुणे ९२८४७४२९७७

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…