पुणे : स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA Type-1) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत असलेल्या चिमुकली गार्गी संदीप जाधव हिच्या उपचारासाठी पिंपळे निलख येथील संजय मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. गार्गीच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता असून, तिच्या कुटुंबीयांनी समाजातील नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत संजय मित्र मंडळाने पुढाकार घेत आर्थिक सहकार्य केले.
दरम्यान, पिंपळे निलख परिसरातील सर्व गणेश मंडळांनी गार्गीच्या उपचारासाठी पुढे येऊन शक्य ते आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन संजय मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि सेवाभाव जपणारा उत्सव असल्याने सर्व मंडळांनी एकत्रितपणे मदतीचा हात पुढे केल्यास गार्गीच्या उपचारासाठी मोठी मदत उभी राहू शकते, अशी भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. “एका चिमुकलीच्या आयुष्यासाठी मदतीचा हात पुढे करणे, हेच आपले खरे सामाजिक आणि मानवी कर्तव्य आहे,” अशी भावना यावेळी मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


