कोल्हापूर, राजन शेळके (प्रतिनिधी) : अश्विन शुक्ल दशमी अर्थात विजयादशमीनिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली आहे. शाही दसरा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आई अंबाबाईच्या या पूजेला विशेष महत्त्व आहे.
सायंकाळी आई अंबाबाई पालखीत विराजमान होऊन ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळ्यासाठी प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यासाठी ऐतिहासिक मेबॅक कारमधून श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती आणि श्रीमंत यशराजे छत्रपती यांच्यासह राजपरिवाराचे आगमन होणार आहे.
यानंतर आपट्याच्या राशीची आणि अपराजिता भवानीची पूजा करून आरती केली जाते. तसेच बंदुकीच्या फैरी झाडून शाही दसरा सोहळ्याची परंपरा पार पाडली जाते. ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ या शुभेच्छांच्या गजरात आपट्याची पाने अर्थात सोने लुटून दसरा साजरा केला जातो. कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या शाही दसरा सोहळ्याच्या निमित्ताने करवीर निवासिनी आई अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली आहे.


