अमरावतीत प्रथमच ‘ढोलीडा फेस्ट’चा रंगतदार गरबा उत्सव!

संस्कृती जपण्याचा संकल्प; अश्लील हिंदी गाण्यांना फाटा, पारंपरिक गरब्यालाच प्राधान्य

अमरावती. राज माहोरे (प्रतिनिधी) : गरबा म्हणजे केवळ नृत्याचा उत्सव नव्हे, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक भावनेचे प्रतीक! याच सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने अमरावतीत प्रथमच ‘ढोलीडा फेस्ट’ या भव्य गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बडनेरा रोडवरील मैवेद्यम रिसॉर्ट येथे होणाऱ्या या उत्सवात पारंपरिक गरबा संगीताला प्राधान्य देण्यात येणार असून, अश्लील हिंदी गाण्यांना पूर्णपणे फाटा देण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.

आधुनिक मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावात पारंपरिक गरब्याचे मूळ स्वरूप कायम राहावे, धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन व्हावे तसेच नव्या पिढीला आपल्या समृद्ध परंपरेची ओळख व्हावी, हा ‘ढोलीडा फेस्ट’च्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. चित्रपटांतील गाण्यांऐवजी पारंपरिक गरबा गीतांच्या तालावर नागरिकांना गरब्याचा आनंद घेता येणार आहे. संस्कृतीचे जतन आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम घडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

अश्लील गाण्यांना थारा नाही; पारंपरिक गरब्याचा जागर!

गरबा उत्सवाच्या नावाखाली अश्लील गाणी आणि संस्कृतीशी विसंगत संगीताला प्राधान्य मिळू नये, यासाठी आयोजकांनी पारंपरिक गरबा संगीतावर भर दिला आहे. शुद्धता, सात्त्विकता आणि सांस्कृतिक परंपरेचे भान राखत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पारंपरिक गरब्याची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी ‘ढोलीडा फेस्ट’ हा विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहे.

महिला सुरक्षेसह कुटुंबांसाठी सुविधा

उत्सवात सहभागी होणाऱ्या महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी बाउन्सर्स व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळ क्षेत्र, खाद्यपदार्थांसाठी फूड झोन आणि अन्य आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित व आनंददायी वातावरणात गरब्याचा आनंद घेता यावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

युवा उद्योजकांचा सांस्कृतिक उपक्रम

डागा डेकोरेटर्सचे संचालक यशवर्धन विनोद डागा आणि सलीनी कॅटरर्सचे संचालक नचनीत संजय साहू यांच्या पुढाकारातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावतीत प्रथमच अशा स्वरूपाचा पारंपरिक गरबा उत्सव आयोजित करून सांस्कृतिक परंपरेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

१४ ऑक्टोबर रोजी मैवेद्यम रिसॉर्ट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक दिनेश बूब, नगरसेवक तथा अधिवक्ता प्रशांत देशपांडे, गोपाल धूत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘ढोलीडा फेस्ट’ची संकल्पना, पारंपरिक गरबा संस्कृतीचे महत्त्व आणि आयोजनासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. खंडेलवाल मीनाक्षी ज्वेलर्स हे उत्सवाचे मुख्य प्रायोजक असून, दैनिक प्रतिदिन आणि चुन केसरी हे मीडिया पार्टनर आहेत. अमरावतीतील गरबाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…