अमरावती ,राज माहोरे (प्रतिनिधी) : भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल अशा लढवय्ये व क्रांतिकारी पुरुषांची मोठी परंपरा लाभलेला आदिवासी समुदाय आणि प्रसंगी मेळघाटात वाघ व अस्वलांशी दोन हात करायला न घाबरणारा हा समुदाय आहे. आपली ही लढवय्यी प्रवृत्ती न विसरता अंधश्रद्धेला दूर सारून शिक्षणाची कास व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विद्यार्थ्यांनी पुढे जावे, असा मोलाचा संदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी डोमा येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळेत दिला. तसेच सनदी अधिकाऱ्यांनी अंधश्रद्धेला भीक न घालता आयएएस व आयपीएस अधिकारी बनण्याची स्वप्न बघून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा, असा मौलिक सल्ला दिला.
चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी, दि. 1 सप्टेंबर रोजीच्या भेटीद्वारे एक अनोखा कार्यक्रम पार पडला. सनदी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाराच्या पलीकडे जाऊन एका पालकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी रात्रभर संवाद साधत प्रगल्भ विचाराचे दर्शन घडविले. याद्वारे अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी संवेदनशील प्रशासनाचे हे एक अत्यंत धाडसी व भूषणावह पाऊल ठरले. आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय अधिकारी किसन तडवी यांनी संपूर्ण तालुका प्रशासनासह आश्रमशाळेला भेट दिली.
आम्हीही घडलो तुम्हीही घडा
विद्यार्थ्यांसोबत भोजन केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मित्रांगत कट्टयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रंगतदार व खुमासदार प्रश्नांनी अनौपचारिक चर्चेतून भविष्यातील ध्येय गाठण्याचे विचार हे यातून पुढे आले. तुम्ही आयएएस आणि आयपीएस कसे झालात हे आपसूक आलेले प्रश्न व त्यांना या अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर खास आकर्षण होते. हा संवाद आम्ही घडलो आणि तुम्हीही घडा असाच ठरला. शालेय जीवनातच एका आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीने प्रभावित होऊन आयएएस होण्याचा बांधलेला चंग जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि आपण विद्यार्थी दशेतच काय बनायचं हे ठरवलं, ते तुम्हीही करू शकता, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.
सत्यम गांधी आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी बीएची पदवी घेतली असली तरी आपण आयएएस घडलो असल्याचा प्रवास केवळ दुर्दम इच्छाशक्तीने आणि मेहनतीने पूर्ण होऊ शकला. ते आपणही करू शकतात, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. आश्रमशाळेत कथित भूत असल्याच्या दाव्याविरुद्ध विज्ञानाची कास धरत अंधश्रद्धेला विरोध करण्याचे व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी या हितगुजावेळी केले. त्यांना भविष्यातील विविध शैक्षणिक वाटचालींसाठी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी, प्रसिद्ध खंजिरी वादक संदीपपाल महाराज यांनी अंधश्रद्धेविरुद्ध सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना प्रबोधन केले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केले. भोजन करतानाच अनौपचारिक गप्पाही मारल्या. यावेळी आश्रमशाळेत मुलींसाठी बांधण्यात आलेल्या नवीन वसतिगृहाची पाहणी व उद्घाटनही करण्यात आले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी असे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला उद्बोधन केले. आमच्या मनातील भिती दूर केली. आम्हाला विश्वास दिला. मनावर ताबा ठेवून त्याला चांगले वळण लावल्यास आपणही मोठे अधिकारी होऊ शकतो, हा त्यांनी दिलेला संदेश आम्हाला आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहेत, अशा भावना शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमाची अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी कल्याणी गोपीचंद जावरकरने व्यक्त केल्या.


