मुंबईत भरतीचा इशारा; पावसाऐवजी आता समुद्राच्या लाटांची चिंता

१६ जुलैला सर्वाधिक ४.८९ मीटर भरतीचा अंदाज; किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे बीएमसीचे आवाहन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत दिली असली, तरी मुंबईकरांची चिंता मात्र संपलेली नाही. कारण आता धोका पावसाचा नसून समुद्राच्या वाढत्या भरतीचा आहे. मुंबई महानगरपालिकेने १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा दिला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

जुलैच्या सुरुवातीला मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दमछाक केली होती. त्यानंतर हवामानात थोडी उसंत मिळाल्याने अनेक जण समुद्रकिनाऱ्यांकडे वळत आहेत. मात्र, याच काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता वाढल्याने बीएमसीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी दुपारी १.३६ वाजता सर्वाधिक ४.८९ मीटर उंच भरती येण्याचा अंदाज आहे. याशिवाय १५ जुलैला ४.८५ मीटर, १७ जुलैला ४.८३ मीटर आणि १८ जुलैला ४.६६ मीटर उंच लाटा उसळू शकतात.

बीएमसीने विशेषतः गिरगाव चौपाटी, जुहू, दादर, वर्सोवा आणि इतर किनारी भागात जाणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भरतीच्या काळात समुद्राच्या जवळ जाणे, सेल्फी काढण्यासाठी पुढे सरकणे किंवा लाटांजवळ थांबणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आणि महापालिकेकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या माहितीनुसार राज्यात मान्सून पुन्हा २० जुलैनंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईत जोरदार पावसाची शक्यता कमी असून वातावरण तुलनेने कोरडे राहू शकते. मुंबईकरांसाठी हा आठवडा पावसापेक्षा समुद्राच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा आहे. किनाऱ्यावर फिरायला जाण्याचा मोह टाळून सुरक्षिततेला प्राधान्य देणे, हेच पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

ज्येष्ठ विधिज्ञ अँड. के. डी. धुमाळ यांना ‘आनंदोत्सव’चा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : अकोले तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ, माजी नगराध्यक्ष तथा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते अँड. के. डी. धुमाळ यांची सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व…

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई; ८ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड , रवींद्र ओंढेकर ( प्रतिनिधी ): व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या इसमावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ५२ व्यावसायिक गॅस सिलिंडरसह टाटा इंट्रा छोटा हत्ती…