देशभरातील वाहनधारकांसाठी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खासगी क्षेत्रातील इंधन विक्रेता कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपयांची कपात केली आहे. १ जुलै २०२६ पासून कंपनीच्या देशभरातील सुमारे ७ हजार पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू झाले आहेत. गेल्या दोन वर्षांतील ही पहिली दरकपात असल्याचे सांगितले जात आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम आशियात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर ७० डॉलरच्या आसपास आले. त्यानंतर जागतिक बाजारातील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले.
दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपांवर पूर्वीचेच दर कायम आहेत. सरकारी कंपन्यांच्या पंपांवर सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रतिलिटर, मुंबईमध्ये पेट्रोल १११.२१ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल ११३.४७ रुपये आणि डिझेल ९९.८२ रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल १०७.७६ रुपये आणि डिझेल ९९.६६ रुपये, तर बंगळुरूमध्ये पेट्रोल ११०.८९ रुपये आणि डिझेल ९८.८० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. महाराष्ट्रात सरकारी कंपन्यांच्या पंपांवर मुंबईमध्ये पेट्रोल १११.१८ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपये, नागपुरात पेट्रोल १११.८० रुपये आणि डिझेल ९८.४८ रुपये, पुण्यात पेट्रोल ११२.०४ रुपये आणि डिझेल ९८.६८ रुपये, अमरावतीमध्ये पेट्रोल ११२.८९ रुपये आणि डिझेल ९९.५४ रुपये, नाशिकमध्ये पेट्रोल ११२.४४ रुपये आणि डिझेल ९९.०७ रुपये, ठाण्यात पेट्रोल १११.३८ रुपये आणि डिझेल ९८.०० रुपये, तर कोल्हापुरात पेट्रोल ११२.५७ रुपये आणि डिझेल ९९.२३ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.


