कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे-टोकावडे परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याणहून अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसची समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारशी जोरदार धडक झाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुरबाड तालुक्यातील वैशाखरे वळणाजवळ हा अपघात घडला. बस व स्कॉर्पिओची धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चुराडा झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.


