अहिल्यानगर. राधेशाम कुलकर्णी अहिल्यानगर जिल्हा प्रमुख: सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून बायो-CBG प्रकल्प उभारणीला केंद्र सरकारकडून मिळणारे पाठबळ हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्पामुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल, असा विश्वास जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्या प्रतिदिन १६ टन क्षमतेच्या बायो-CBG प्रकल्पाचे भूमिपूजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. केंद्र सरकारच्या गोवर्धन योजनेंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
शेतीतील टाकाऊ कचऱ्याचा वापर करून हरित ऊर्जेची निर्मिती केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक विकासाच्या संकल्पनेला हा प्रकल्प बळ देणारा ठरेल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी नव्या प्रकल्पामुळे शेतकरी हिताला चालना मिळणार असल्याचे सांगितले. तसेच कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे गाळप क्षमतेत वाढ झाल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते. यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी सभासद आणि मान्यवर उपस्थित होते. म्हस्के पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाच लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ सहाय्यता निधीसाठी शासनाकडे सुपूर्द करण्यात आला.


