थकीत वीजबिलधारकांना महावितरणचा मोठा दिलासा!

व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ; ‘अभय योजना २०२६-२७’ सुरू

अहिल्यानगर (अकोले). — राधेश्याम कुलकर्णी, अहिल्यानगर जिल्हा प्रमुख:
थकीत वीजबिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने मोठा दिलासा देणारी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र ग्राहकांना थकीत वीजबिलावरील व्याज आणि विलंब आकारात १०० टक्के माफी मिळणार आहे. तसेच मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार असून, हप्त्याने पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अकोले उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता विवेक शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे.
३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि अन्य बिगरकृषी ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र, कृषिपंप ग्राहक आणि सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
१५ डिसेंबर २०२६ पर्यंत मूळ थकबाकीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना विशेष अर्ली बर्ड सवलत मिळणार आहे. लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांची वीजजोडणी तीन वर्षांपर्यंत कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खंडित असल्यास २० टक्के सवलत दिली जाणार आहे. इतर लघुदाब ग्राहकांना १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना १५ टक्के सवलत मिळणार आहे.
एकरकमी थकबाकी भरणे शक्य नसलेल्या लघुदाब ग्राहकांना मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा प्रारंभी भरणा करून उर्वरित रक्कम सहा समान मासिक व्याजमुक्त हप्त्यांत भरता येणार आहे. उच्चदाब ग्राहकांनाही थकबाकीच्या रकमेनुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा देण्यात आली आहे.
याशिवाय, २० किलोवॅटपर्यंत मंजूर वीजभार असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीवेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारल्यास मूळ थकबाकीवर आणखी ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. पुनर्जोडणी शुल्क तसेच लघुदाब ग्राहकांचे सेवा जोडणी शुल्कही माफ करण्यात येणार आहे.
पात्र ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अनेक वर्षांपासून थकीत वीजबिलामुळे अंधारात असलेल्या ग्राहकांसाठी पुन्हा वीजजोडणी सुरू करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे.
त्यामुळे अकोले तालुक्यासह परिसरातील पात्र थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेची माहिती घेऊन निर्धारित मुदतीत अर्ज करावा आणि उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोले उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता विवेक शिंदे यांनी केले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

उद्योगमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी

नांदेड. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी बांधवांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा केला. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा पारंपरिक फराळ करण्याचा…

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार: आमदार पाटील

नांदेड. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी…