नांदेड, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कर्जवसुलीच्या मुद्द्यावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांना घेराव घालणे आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सुरक्षेची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. फायनान्स कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी सामान्य आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच अनेक महिला कर्मचारीही या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यालयांवरील हल्ले आणि तोडफोडीच्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण आहे. शेतीशी निगडित कर्जाबाबत शासनाने यापूर्वी निर्णय घेतला असल्यास त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, गृहकर्ज आणि इतर पात्र कर्जांच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यासाठी शासनाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी समन्वय साधावा. यासाठी आवश्यक शासन निर्णय (जीआर) किंवा नियमानुसार योग्य निर्देश जारी करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
अशा निर्णयामुळे कर्जदारांना दिलासा मिळण्यासोबतच फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील तणाव कमी होण्यास मदत होईल. तसेच कार्यालयांमध्ये होणारी तोडफोड, धमकावणे आणि हिंसक प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना मंगेश शिंदे, व्यंकटेश पाटील, बालाप्रसाद शिंदे, विलास राठोड, जगदीश हिंगणे, पांडुरंग करपे, विजय भोसले, दीपक कल्याणकर, गजानन देसाई, पांडुरंग धोंडगे यांच्यासह असंख्य कर्मचारी उपस्थित होते. हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नांदेड पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आले आहे.


