अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : ‘देव-देश-धर्म’ या संकल्पनेतून अनाहत एक कलासृष्टीच्या वतीने ‘द भक्ती बीट्स’ या भजन जॅमिंग अँड फ्युजन संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावीर ग्रुपच्या विशेष सहकार्याने तसेच विचार भारती आणि समर्थ सत्संग परिवार यांच्या सहयोगातून माऊली सभागृहात हा सांगीतिक सोहळा पार पडला. पारंपरिक भारतीय वाद्ये आणि पाश्चात्त्य वाद्ये यांचा सुंदर मिलाफ, भक्तिसंगीताचा आध्यात्मिक गंध आणि आधुनिक संगीताचा दमदार ठेका यामुळे अहिल्यानगरकरांना भक्तिसंगीताचा अनोखा अनुभव मिळाला. रसिकांनी या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला.
समर्थभक्त मंदारबुवा रामदासी यांच्या आशीर्वचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘आई गिरी नंदिनी’ या देवीच्या भक्तिगीताने झाली. त्यानंतर ‘हनुमान चालीसा’च्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. ‘मंगल भवन अमंगल हारी’ या भगवान श्रीरामांच्या गीताने सभागृहात ‘जय श्रीराम’चा जयघोष घुमला. ‘राम नाम जप’, ‘वो कान्हा तेरी बासुरी’, ‘ब्रज रस’, ‘अरे द्वारपालो’, ‘रामा रामा रटते रटते’ आणि ‘अवध में राम आए हैं’ या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
‘ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने’ आणि ‘नमो नमो जी शंकरा’ या गीतांतून भगवान शंकराला संगीतमय वंदन करण्यात आले. त्यानंतर ‘कीजो केसरी के लाल’, ‘श्रीराम जानकी’, ‘बघ उघडुनी दार’ आणि ‘हरी म्हणा तुम्ही’ या गीतांनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली. भक्तिगीतांच्या तालावर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, आमदार संग्राम जगताप, उपमहापौर धनंजय जाधव, महावीर ग्रुपच्या विजयाताई भंडारी, चंदूकाका सराफचे गणेश निकम, साईदीप हिरोचे सुधीर चोपडा, नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, विचार भारतीचे राजाभाऊ मुळे, सुधीर लांडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, ॲडलॅबचे अविनाश शिरापुरी, अनाहतचे प्रसाद सुवर्णपाठकी आणि प्रसाद बेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी समर्थभक्त मंदारबुवा रामदासी म्हणाले की, अनाहत एक कलासृष्टीने समाजात भक्तीचे विचार रुजविण्यासाठी मोठे धाडस दाखवत हा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा सात्त्विक आणि संस्कारक्षम कार्यक्रमांना समाजातून पाठबळ मिळणे आवश्यक आहे. शरीरात देव, दानव आणि मानव या तिन्ही प्रवृत्ती असतात. मानवाकडून देवत्वाकडे जाण्याचा प्रवास या भक्तिसोहळ्यातून अनुभवता येतो. अनाहत नादाचा उंबरठा ओलांडून संगीताच्या माध्यमातून ईश्वराची अनुभूती घेता येते, असे त्यांनी सांगितले. या भक्तिमय उपक्रमाच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात उमेशराज साळुंके, गणेश बैरागी, सौरभ साठे, गौरी रत्नपारखी, महेशराज साळुंके, ज्ञानेश्वर पाठक, विधान बैरागी, भावेश राणे, किर्तेश बाविस्कर, सागर वाघमारे, धनंजय गोहेर, अनिकेत साळुंके आणि यश फुलारे या गायक व वादकांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रत्येक कलाकाराने आपल्या सादरीकरणातून भक्तिगीतांना वेगळी उंची दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.
भक्तिसंगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि समृद्ध परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. पारंपरिक भजनांमधील भक्तिभाव, भावस्पर्शी शब्द आणि आध्यात्मिक ऊर्जा यांना आधुनिक संगीतशैलीची जोड देत नव्या पिढीला भारतीय भक्तिसंगीताशी जोडण्याचा अनोखा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ओंकार देऊळगावकर, ॲड. आनंद कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, श्रेया सुवर्णपाठकी, अमृता बेडेकर, वैष्णवी कुलकर्णी, सोहम सौंदणकर, विनोद गरुड, बंटी ढोरे, अनुजा कुलकर्णी, गायत्री धनलगडे, गीतांजली सगम, अमित डोंगरे, जान्हवी देऊळगावकर, अनिकेत गोसावी, मोहिनी खोल्लम, सर्वेश खोल्लम आणि योगेश पंडित यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास नगरसेवक कुमार वाकळे, डॉ. प्रकाश व सुधा कांकरिया, मनोज झंवर, विक्रम डीडवाणिया, हर्षद भावे, अविनाश देऊळगावकर, अशोक गांधी, विलास बडवे, चंद्रकांत पंडित, किशोर कुलकर्णी, राधिका सुवर्णपाठकी, अनघा पछाडे आणि अभिजित अपस्तंभ आदी मान्यवर उपस्थित होते.


