आशिष औंढेकर, प्रमुख पश्चिम महाराष्ट्र : दीपोत्सवाच्या मंगल पर्वानिमित्त सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथे २९ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सामूहिक सहभागातून हिंदवी स्वराज्याच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली. कलात्मकता, कल्पकता आणि इतिहासाविषयीची आस्था यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
या ऐतिहासिक प्रतिकृतीचे अनावरण शाळेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, मुख्याध्यापिका सुजाता गोळे तसेच वाहतूक व सुरक्षा विभाग प्रमुख मयूर मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठेचे स्मरण केले. कार्यक्रमात विद्यार्थी संग्राम चौधरी याने जोशपूर्ण शिवगर्जना सादर केली. तसेच राजगड किल्ल्याचा इतिहास, त्याचे महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा याविषयी माहिती देऊन उपस्थितांना इतिहासाच्या गौरवशाली पानांची ओळख करून दिली.
यानंतर मयूर मसुरकर यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या दीपोत्सवाच्या प्रेरणादायी प्रवासाचे कथन केले. राजगडापासून सुरू झालेला हा दीपोत्सवाचा प्रवास आज बारा किल्ल्यांपर्यंत विस्तारला आहे. एका सुंदर संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाने परंपरा, संस्कृती आणि इतिहास जपणारी प्रेरणादायी चळवळ म्हणून ओळख निर्माण केली आहे.
या प्रतिकृतीच्या निर्मितीमागे केवळ कलाविष्कार नसून, गेल्या पंधरा वर्षांपासून मयूर मसुरकर यांनी शाळेचे संस्थापक संजय नहार आणि संस्थापिका सुषमा नहार यांच्या प्रेरणेतून जोपासलेल्या दीपोत्सवाच्या संकल्पनेची जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. सरहद संस्थेतर्फे आयोजित दीपोत्सवाचे महत्त्व विद्यार्थी आणि पालकांना समजावे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा तसेच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाविषयी आदर, संस्कृतीविषयी अभिमान आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


