आज गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

लाखो गुरुदेवभक्तांची उपस्थिती; विश्वशांतीसाठी घेणार संकल्प

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी गुरुकुंज आश्रमात भावपूर्ण मौन श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात लाखो गुरुदेवभक्त सहभागी होऊन आपल्या गुरुमाऊलीला श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मराठी तिथीनुसार अश्विन वद्य पंचमी, शके १८९० रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुरुकुंज आश्रमात महानिर्वाण झाले होते. त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन करण्यात आले.

विश्वशांतीसाठी घेणार संकल्प

जगातील विविध भागांत सुरू असलेली युद्धे, हिंसाचार आणि धार्मिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात विश्वशांतीचा संकल्प करण्यात येणार आहे. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना आणि सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात पार पडणार आहे.

पालखी-दिंड्यांसह भाविक गुरुकुंजात दाखल

राष्ट्रसंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध ठिकाणांहून हजारो भाविक पालखी आणि दिंड्यांसह गुरुकुंज आश्रमात दाखल झाले आहेत. श्रद्धांजली कार्यक्रमापूर्वी मुख्य सभामंडपात राष्ट्रसंतांचे गुरू आडकोजी महाराज यांच्या वरखेड येथील पालखीचे, तसेच राष्ट्रसंतांचे जन्मगाव यावली आणि तपोभूमी गोंदोडा येथील पालख्यांचे स्वागत व पूजन अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

दुपारपासूनच भाविकांची गर्दी

मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी भजन आणि निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य व विचार भाविकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. कार्यक्रमासाठी दुपारी २ वाजल्यापासूनच मुख्य सभामंडपात भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात होते. काही वेळातच संपूर्ण परिसर भाविकांनी भरून जातो. त्यामुळे उशिरा येणाऱ्या भाविकांना जिथे जागा मिळेल, तिथूनच कार्यक्रमात सहभागी व्हावे लागते.

पुण्यतिथी महोत्सवातील मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्वाधिक भावोत्कट मानला जातो. या दिवशी सर्वसंत स्मृती आणि मानवता दिनही साजरा करण्यात येतो. देशभरातील साधुसंत, विद्वान, प्रचारक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि भाविक या कार्यक्रमासाठी गुरुकुंज आश्रमात उपस्थित राहणार आहेत.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…