लोहपुरुषाचा अखंड भारत, जगातील सर्वात उंच कर्तृत्व आणि आजच्या युवाशक्तीपुढील आव्हाने

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा महामंत्र

एकतीस ऑक्टोबर हा केवळ आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या एका पोलादी महापुरुषाच्या उपकारांचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस आहे. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो.

आज जेव्हा आपण गुजरातच्या केवडिया येथे नर्मदा नदीच्या काठावर उभा असलेला जगातील सर्वात भव्य पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा पुतळा वाटत नाही, तर तो या देशाच्या अखंडतेचे, सार्वभौमत्वाचे आणि अढळ आत्मविश्वासाचे जिवंत प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभा राहतो.

आजच्या बदलत्या, अस्थिर आणि काहीशा उतावीळ वातावरणात सरदार पटेल यांचे विचार, त्यांचे बालपण, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि त्यांनी घडविलेला अखंड भारत यांचा सखोल अभ्यास करणे ही काळाची गरज बनली आहे. विशेषतः आजच्या युवाशक्तीला राष्ट्रवादाची खरी व्याख्या समजून सांगण्यासाठी सरदारांचे जीवनचरित्र हाच सर्वात मोठा दीपस्तंभ आहे.

बालपण आणि शिक्षण

सरदार पटेल यांच्या अथांग आणि पोलादी कर्तृत्वाची पाळेमुळे त्यांच्या बालपणातच रुजलेली होती. गुजरातमधील नडियाद येथे झवेरभाई आणि लाडबा यांच्या पोटी एका सामान्य शेतकरी कुटुंबात वल्लभभाई यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत आणि कष्टात गेले. शेतात वडिलांना मदत करीत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

बालपणातील एक प्रसिद्ध प्रसंग त्यांच्यातील अफाट सहनशक्ती आणि धैर्याची साक्ष देतो. त्यांच्या काखेत एक मोठे गळू आले होते. त्या काळात त्यावर गरम लोखंडी सळईने डाग देण्याचा उपचार केला जात असे. तो उपचार करणारा माणूस वल्लभभाई यांचे कोवळे वय पाहून घाबरला. तेव्हा लहानग्या वल्लभभाई यांनी स्वतःच्या हाताने ती लालभडक तापलेली सळई घेतली आणि क्षणाचाही विचार न करता आपल्या गळूवर दाबून धरली. चेहऱ्यावर वेदनेची एक रेषही न आणता त्यांनी हा त्रास सहन केला.

हाच तो बाणा होता, ज्याने पुढे जाऊन अखंड भारताच्या निर्मितीतील सर्वात मोठे अडथळे दूर केले. गरिबीमुळे वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून त्यांनी मित्रांची पुस्तके मागून अभ्यास केला आणि जिल्ह्याची वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे लंडन येथे बॅरिस्टरचा अभ्यासक्रम त्यांनी मुदतीपूर्वीच पूर्ण केला, तोही पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन. परंतु नियतीला त्यांच्याकडून कोर्टातील खटले नव्हे, तर देशाचा इतिहासच घडवून घ्यायचा होता.

सरदार पटेल यांचे नाशिक कारागृहातील वास्तव्य : प्रखर राष्ट्रवाद, त्याग आणि आजचा बोध

स्वातंत्र्य चळवळीत इंग्रज सरकारविरुद्ध प्रखर लढा देत असताना ब्रिटिश सरकारने पटेल यांना नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदी म्हणून ठेवले होते. नाशिकची ही पावनभूमी लोहपुरुषाच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाने पवित्र झाली आहे. नाशिकच्या या बंदिवासात असतानाही सरदारांचे मन देशाच्या स्वातंत्र्यापासून आणि एकतेच्या विचारांपासून कधीही विचलित झाले नाही. हा इतिहास प्रत्येक नाशिककरासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.

विठ्ठलभाईंचे निधन आणि सरदारांचा सर्वोच्च कौटुंबिक त्याग

नाशिकच्या तुरुंगात बंदिस्त असताना त्यांचे थोरले बंधू आणि थोर स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलभाई पटेल यांचे निधन झाले. ब्रिटिश सरकारने सरदार यांच्यासमोर एक अट ठेवली की, तुम्ही राजकीय कार्यात भाग घेणार नाही, असे लेखी द्याल तर तुम्हाला अंत्यसंस्कारासाठी सोडले जाईल. स्वतःच्या भावाच्या निधनाचे अथांग दुःख असतानाही स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ सरदारांनी स्पष्ट नकार दिला आणि तुरुंगात राहणे पसंत केले; पण देशाच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही.

वैयक्तिक दुःखापेक्षा राष्ट्रहित मोठे : उतावीळ आंदोलनांना चपराक

आपल्या देशात क्षुल्लक कारणांवरून वैयक्तिक किंवा जातीय स्वार्थासाठी जी उतावीळपणे रस्ते अडविले जातात आणि हिंसक आंदोलने केली जातात, त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचा नाशिकमधील त्याग ही मोठी चपराक आहे. स्वतःच्या भावाच्या अंत्यसंस्काराला जाण्यापेक्षा ज्या महापुरुषाने देशाची तत्त्वे मोठी मानली, त्यांच्या देशात आजचे तरुण वैयक्तिक मागण्यांसाठी राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान कसे करू शकतात, हा विचार आजच्या तरुण पिढीने करण्याची गरज आहे.

नाशिककरांसह सर्वांना संदेश : संयम, शिस्त आणि अखंडतेचा बोध

नाशिकच्या मातीत सरदारांच्या ज्या त्यागाचा आणि पोलादी संयमाचा इतिहास लपलेला आहे, तो संयम आजच्या नाशिकच्या आणि देशाच्या युवाशक्तीने अंगी बाळगला पाहिजे. कोणत्याही राष्ट्रविघातक शक्तीच्या किंवा सोशल मीडियावरील भुलथापांना बळी न पडता उतावीळपणा सोडून तरुणांनी देशाच्या अखंडतेसाठी काम केले पाहिजे. आपल्या मातृभूमीचे अंतर्गत आणि बाह्य शक्तींपासून रक्षण करणे, हीच नाशिकच्या भूमीतून सरदारांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.

आधुनिक काळातील भव्य कृतज्ञता : स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि राष्ट्रीय एकता दिन

ज्या महापुरुषाने देशाला एवढे मोठे वैभव दिले, त्यांच्या आठवणी काळाच्या ओघात विसरल्या जाऊ नयेत म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. केंद्र सरकारने सरदार पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. आज या दिवशी संपूर्ण देशात एकता आणि अखंडतेची शपथ घेतली जाते आणि तरुण पिढीला एकत्र आणण्यासाठी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन केले जाते.

केवळ घोषणा करून न थांबता गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे सरदार पटेल यांच्या कर्तृत्वाला साजेसा असा जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्यात आला. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी भारतातील लाखो गावांतील शेतकऱ्यांकडून लोखंड आणि माती गोळा करण्यात आली होती. हा पुतळा केवळ पर्यटनाचे केंद्र नव्हे, तर तो देशातील प्रत्येक नागरिकाला आपण एक आहोत, ही भावना देणारा राष्ट्रीय ऊर्जास्रोत आहे.

कर्तृत्वातून आजचा बोध आणि तरुण पिढीची जबाबदारी

आजच्या राष्ट्रीय एकता दिनी देशातील प्रत्येक तरुणाने सरदार पटेल यांच्या जीवनातून बोध घेणे आवश्यक आहे.

राष्ट्र प्रथमचा विचार : आपली जात, आपला पंथ, आपली भाषा किंवा आपली राजकीय विचारसरणी कोणतीही असो; पण जेव्हा देशाच्या अखंडतेचा विषय येतो, तेव्हा आपल्या मनात केवळ आणि केवळ भारत हा एकच विचार असायला हवा. देशाच्या हितापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही.

संयम आणि शिस्त : सरदार पटेल हे स्वतः आंदोलनाचे महामेरू होते; परंतु त्यांनी कधीही उतावीळपणा केला नाही. त्यांच्या प्रत्येक सत्याग्रहामागे सखोल अभ्यास, शिस्त आणि शांततापूर्ण मार्ग होता. त्यांनी प्रशासनाशी संवादाचे दरवाजे कधीही बंद केले नाहीत. आजच्या तरुणांनी उतावीळपणा सोडून संयम बाळगून आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची शिस्त अंगी बाळगली पाहिजे.

हक्कांसोबत कर्तव्याची जाणीव : आपण नेहमी संविधानाने दिलेल्या हक्कांबद्दल बोलतो आणि त्यासाठी आंदोलने करतो. पण सरदार पटेल यांचे स्पष्ट मत होते की, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तोपर्यंत तुम्हाला हक्क मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, कायद्यांचा आदर करणे आणि सामाजिक सलोखा राखणे हे आपले कर्तव्य आहे.

आत्मनिर्भरता : मातृभूमीचे संरक्षण असो की आर्थिक क्षेत्र असो, आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल. तरुणांनी आपल्या कौशल्याचा आणि बुद्धीचा वापर आपल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी केला पाहिजे. हीच खरी मातृभूमीची सेवा ठरेल.

विविधतेचा आदर : भारताची विविधता हीच आपली ताकद आहे. प्रांतीय किंवा जातिभेदांच्या पलीकडे जाऊन एकमेकांना भारतीय म्हणून स्वीकारणे आणि एकमेकांचा आदर करणे, हीच खरी राष्ट्रीय एकता आहे.

निष्कर्ष आणि संकल्प

लोहपुरुष सरदार यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून, अहोरात्र कष्ट उपसून आणि पोलादी निश्चयाने विखुरलेल्या भारताला एकसंध करून अखंड भारत आपल्या हाती सोपविला आहे. हा अतुल्य ठेवा जतन करणे ही आजच्या युवाशक्तीची सर्वात मोठी नैतिक आणि ऐतिहासिक जबाबदारी आहे. आजच्या चुकीच्या, भरकटलेल्या आणि उतावीळ वातावरणाला नाकारून तरुणांनी विवेकाची आणि संयमाची वाट धरली पाहिजे. कोणत्याही राष्ट्रविघातक शक्तीच्या भुलथापांना बळी न पडता त्या ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीसाठी केला पाहिजे. या राष्ट्रीय एकता दिनी आपण सर्वजण मनापासून संकल्प करूया की, आम्ही आमची युवाशक्ती भरकटू देणार नाही, आम्ही आमच्या मातृभूमीचे संरक्षण करू, देशातील एकता आणि अखंडत्व अबाधित राखू आणि भारताला विजयाच्या शिखरावर नेण्यासाठी निरंतर कार्य करू. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

प्रदीप पाटील
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नाशिक

 

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय…

आज गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी गुरुकुंज आश्रमात भावपूर्ण मौन श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…