अमरावती ,राज माहोरे (प्रतिनिधी) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत वडिलांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अमरावती शहरात उमटले. भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने शहरातील मध्यवर्ती राजकमल चौकात आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी, बादल कुलकर्णी, चेतन गावंडे यांच्यासह अन्य नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. आंदोलकांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला. राजकीय विरोध करताना वैयक्तिक पातळीवर जाऊन दिवंगत व्यक्तींच्या संदर्भात अवमानकारक भाषा वापरणे अयोग्य असल्याचा आरोप भाजपच्या आंदोलकांनी केला. राजकीय मतभेद असले तरी सार्वजनिक जीवनात बोलताना भाषेचे भान आणि परस्परांविषयी आदर राखणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
खरगे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, त्याचे पडसाद अमरावतीतही दिसून आले. राजकमल चौकात झालेल्या या आंदोलनातून भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार मिळाली आहे.


