राज माहोरे | प्रतिनिधी, अमरावती
अमरावती. श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम, दि. २४ ऑक्टोबर २०२६ : संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे क्रांतीदर्शी युगपुरुष तथा स्वातंत्र्यसैनिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला शनिवारी श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता राष्ट्रसंतांच्या महासमाधीला अभिषेक, तिर्थस्थापना आणि चरणपादुका पूजन करून महोत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली. भजन, मंत्रघोष आणि शंखनादाने परिसर भक्तिमय झाला होता. ‘श्रीगुरुदेव की जय’ या जयघोषाने महासमाधी परिसर दुमदुमून गेला. यावेळी हजारो गुरुदेवभक्त उपस्थित होते. तिर्थस्थापनेनंतर सामुदायिक ध्यानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शंकर महाराज यांनी सामुदायिक ध्यानाचे महत्त्व विशद करताना राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करून सुख, समाधान आणि शांततेचा मार्ग शोधण्याचे आवाहन केले. अनेक नद्यांचे प्रवाह एकत्र येऊन सागर निर्माण होतो, त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी सर्वधर्मांचा सार आपल्या साहित्यातून मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई बोंडे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख गोपाल कडू, दामोदर पाटील, अॅड. दिलीप कोहळे, डॉ. राजाराम बोथे यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.
महोत्सवाच्या प्रारंभी महाद्वारावर प्रकाश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची महासमाधीस्थळापासून गुरुदेवनगरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडी, टाळ, ढोल, डमरू आणि लेझीमच्या माध्यमातून सहभाग नोंदविला. ह.भ.प. मानकर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोल बांबल यांच्या संयोजनात शोभायात्रा पार पडली. महोत्सवानिमित्त योग-प्राणायाम, ग्रामगीता प्रवचन, आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, सामुदायिक प्रार्थना, खंजिरी भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.



