नागपूर : महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या सहा खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नागपूर जिल्हा संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, खेळाडूंवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र क्रीडा मंडळ, नागपूर व हौशी जिल्हा खो-खो संघटना, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर, नागपूर येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीतून गोंदिया येथे दिनांक २७ ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी नागपूर जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली.
या निवड चाचणीत महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या कुमार गटातील चार खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत नागपूर जिल्हा संघात स्थान मिळवले. यामध्ये भाविक बघेल, ओम शेंदरे, गीतांशू सूर्यवंशी आणि सक्षम हाडके या चार खेळाडूंचा समावेश आहे. तसेच मुलींच्या संघात शरण्या पेंडके आणि रितिका रामटेके या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या एकूण सहा खेळाडूंना राज्यस्तरावर नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व खेळाडू न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेसनगर येथील मैदानावर नियमित सराव करतात. त्यांना एनआयएस प्रमाणित खो-खो प्रशिक्षक श्री. वैभव कुंभरे आणि श्री. प्रेम राखडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शरण्या पेंडके ही भवन’स बी. पी. विद्या मंदिर, सिव्हिल लाइन्स येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी असून, उर्वरित पाचही खेळाडू न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे सचिव डॉ. पद्माकर चर्मोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संजय चौधरी आणि श्री. सचिन देशमुख यांचेही खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते. या मार्गदर्शनामुळे खेळाडूंना सातत्यपूर्ण सराव, कौशल्यविकास आणि स्पर्धात्मक कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष ॲड. सुमंत चितळे, कार्याध्यक्ष प्राचार्य विजय दातारकर तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी निवड झालेल्या सहाही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून नागपूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.


