पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी ): महाराष्ट्राला नाट्यकलेची उज्ज्वल परंपरा आहे. वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम २४ तास आव्हानात्मक आणि अविरत सेवा देणारे आहे. दैनंदिन कामाच्या धकाधकीतही कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित करण्यात येणारी नाट्यस्पर्धा हा महावितरणचा मौल्यवान सांस्कृतिक ठेवा आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.
पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात बुधवारी (दि. २१) महावितरणच्या ‘आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून राजेंद्र पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते इब्राहिम मुलाणी, दत्तात्रेय बनसोडे, स्वप्निल काटकर, धर्मराज पेठकर, मिलिंद दिग्रसकर, आयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पडळकर, मुख्य समन्वयक संजय ढोके आणि सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड उपस्थित होते.
राजेंद्र पवार म्हणाले की, नाटकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संवाद कौशल्य आणि वेळेचे नियोजन यांसारखे गुण विकसित होतात. ही सकारात्मक ऊर्जा त्यांच्या कार्यालयीन कामकाजातही दिसून येते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दिलीप जगदाळे म्हणाले की, महावितरणमधील नाट्यकृतींचे सादरीकरण व्यावसायिक नाटकांच्या तोडीचे आहे. महावितरणची रंगभूमी नाट्याविष्कारातून अधिक प्रगल्भ होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले.
या दोन दिवसीय स्पर्धेत चारही प्रादेशिक विभागांतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. पहिल्या दिवशी कोकण विभागाच्या ‘ओल्या भिंती’ या नाटकाने नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर पुणे विभागाचे ‘समोरच्या घरात’ हे नाटक सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (दि. २२) छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’ आणि नागपूर विभागाचे ‘थलाई कुथल’ ही नाटके सादर केली जाणार आहेत. सामाजिक आणि संवेदनशील विषयांवरील या नाट्यकृतींना उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला शिवदे आणि भक्ती जोशी यांनी केले, तर अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.


