२४ व २५ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगरमध्ये संत साहित्य संमेलनाचे आयोजन

ज्ञानेश्वरीच्या निर्मितीस्थळाच्या जिल्ह्यात संत साहित्याचा जागर; भारूड, नाट्य अभिनय आणि नृत्याचे सांस्कृतिक कार्यक्रम

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : वारकरी संप्रदायासाठी महान ग्रंथ असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी अर्थात ‘भावार्थदीपिका’ या ग्रंथाची निर्मिती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे झाल्याने येथे होणाऱ्या संत साहित्य संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, अहिल्यानगर आणि श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग सामूहिक चिंतन महाप्रकल्प यांच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्ये २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन माऊली संकुल सभागृह, सावेडी, अहिल्यानगर येथे होणार असल्याची माहिती संमेलनाचे सचिव संजय खेले यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता नावनोंदणी सुरू होईल. सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, त्यानंतर ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, विमलताई जाधव, तारकेश्वर संस्थान पाथर्डी गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ शास्त्री महाराज, डॉ. सदानंद मोरे, राजकुमार जोशी, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. स्वप्नील सहस्रबुद्धे, डॉ. राजा ठाकूर, अरुण झवर, प्राचार्य प्रकाश पुरुषोत्तम टाकळकर, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, डॉ. बी. जी. शेखर पाटील, प्रा. डॉ. राजेश गायकवाड आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह विविध मान्यवर पहिल्या दिवसाच्या सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सतीश तथा आबा मुळे असून, सहस्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य सुनील पंडित काम पाहणार आहेत.

रविवार, २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विविध सत्रांमध्ये गरवारे महाविद्यालयाच्या भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. वर्षा तोडमल, फर्ग्युसन महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद काटीकर, डॉ. वर्षा कीर्तने यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. दोन दिवसीय संत साहित्य संमेलनात भारूड, नाट्य अभिनय, नृत्य यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. संत साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या प्रेरणेतून हे संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या संमेलनाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार नीलेश लंके यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत साहित्याची आवड असलेल्या बंधू-भगिनींनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

राष्ट्रसेविका समितीचे अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन

अहिल्यानगर : राष्ट्रसेविका समितीच्या वतीने २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अहिल्यानगर शहरात सघोष पथसंचलन काढण्यात आले. गांधी मैदानाजवळील वि. ल. कुलकर्णी प्रशाला येथून संचलनाला प्रारंभ झाला. शहरातील चितळे रोड, नेता सुभाष…

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे विद्यार्थ्यांकडून ई-कचरा संकलन मोहीम

मोशी,प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. आजच्या डिजिटल युगात मोबाईल,…