पिंपरी-चिंचवड, प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) : टाटा मोटर्स सेवा गट व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालू वर्षी गणपती मूर्तिदान व निर्माल्य संकलन करून नद्या प्रदूषित होण्यापासून वाचवण्याचे काम करण्यात आले.
या उपक्रमाला नागरिकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला. गणपती मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवला. ठिकठिकाणी निर्माल्य गोळा करून महापालिकेच्या ट्रकमध्ये भरण्यासाठी स्वयंसेवकांनी मदत केली. पोलिसांसोबत स्वयंसेवकांनी चाफेकर चौक व परिसरात वाहतूक नियंत्रणाचे काम केले. चिंचवडगाव मोरया घाट आणि रिव्हर व्ह्यू घाट या ठिकाणी स्वयंसेवकांनी गणपती मूर्ती संकलनाचे काम केले. या संपूर्ण बारा दिवसांच्या उपक्रमात पांडुरंग सुतार, हरिदास गद्रे, शब्बीर मुजावर, श्रीकांत देवकाते, कुमार जगदाळे, अरुण कळंबे, प्रकाश चव्हाण, सोमनाथ पतंगे, रामदास सैंदाने, किरण बागल आदी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
काही वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक असणारा गणेशोत्सव रासायनिक मूर्ती व रंगसामग्रीमुळे सध्या पर्यावरणासाठी घातक ठरू लागला आहे. अशा परिस्थितीत हा मूर्तिदान उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यामुळे नदी प्रदूषण टाळून संपूर्ण पर्यावरणसाखळी वाचवण्यास मदत होत आहे. समाजातील सर्व स्तरांतून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


