नाशिक, प्रीती आळंद (जिल्हा प्रतिनिधी) : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) च्या सस्टेनेबिलिटी स्टँडर्ड्स बोर्ड आणि नाशिक चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समृद्धी – Sustainability Simplified’ ही विशेष परिषद नाशिक येथे उत्साहात पार पडली. ‘कुंभातून शाश्वततेकडे : संस्कार, संकल्प आणि संवर्धन’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती.
उद्घाटन सत्राला जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, कुंभमेळा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर-अडके आणि कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह (भा.प्र.से.) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयसीएमएआयचे अध्यक्ष सीएमए चित्तरंजन चट्टोपाध्याय आणि सीएमए डॉ. आशिष थत्ते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् व संस्थेच्या गीताने झाली. सीएमए मयूर निकम यांनी स्वागत केले, तर सीएमए चैतन्य मोहरीर यांनी उपस्थितांना शाश्वततेची शपथ दिली. डॉ. रंजित कृष्णन यांनी ‘Sustainability Imperative’ या विषयावर विचार मांडले.
महापौर सौ. आहेर-अडके आणि आयुक्त श्री. सिंह यांनी उद्योग व विविध क्षेत्रांत कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स (सीएमए) करत असलेल्या कामाचे कौतुक केले. कुंभमेळ्याच्या नियोजनात आर्थिक शिस्त, खर्च व्यवस्थापन आणि संसाधनांचा काटकसरीने वापर आवश्यक आहे आणि या कामात सीएमए मोठे योगदान देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर आयसीएमएआयतर्फे मंत्री महोदय, महापौर आणि कुंभमेळा आयुक्त यांना ‘अॅप्रोच नोट’ सादर करण्यात आली. शाश्वतता, खर्च व्यवस्थापन, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यावसायिक कौशल्य यांद्वारे कुंभमेळ्याच्या आयोजनात संस्था व सीएमए कोणते योगदान देऊ शकतात, याची रूपरेषा या नोटमध्ये मांडण्यात आली आहे.
परिषदेच्या निमित्ताने सीएचएमईएस संचालित भोसला महाविद्यालय आणि आयसीएमएआय यांच्यात सामंजस्य करार झाला. शिक्षण, व्यावसायिक कौशल्यविकास, शाश्वतता आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्राशी जोडणारे उपक्रम या करारांतर्गत राबवले जाणार आहेत. या कराराची संकल्पना आणि पुढाकार सीएमए दीपक जोशी यांचा होता. तांत्रिक सत्रांमध्ये सीएमए डॉ. अदिती दासगुप्ता, श्री. प्रशांत बच्छाव, डॉ. प्रीती कुलकर्णी, सीएस मकरंद लेले आणि सीएमए अरुणाभ साहा यांनी मार्गदर्शन केले. शाश्वतता हा विषय पर्यावरणापुरता मर्यादित नसून तो व्यवसाय, अर्थव्यवस्था, प्रशासन आणि सामाजिक विकासाशी जोडलेला आहे, असा सूर या सत्रांमधून उमटला.
शाश्वततेवरील पॅनेल चर्चेत सीएमए हेमंत देशपांडे, डॉ. रंजित कृष्णन, सीएस मकरंद लेले, श्री. नितीन ढगे, श्री. गिरीश पगारे आणि सीए पियुष चांडक सहभागी झाले. सीएमए अनुराधा ढवळीकर यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले. त्यानंतरच्या प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी तज्ज्ञांशी थेट संवाद साधला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएमए चैतन्य मोहरीर आणि सीएमए मैथिली मालपुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सीएमए संतोष ब्राह्मणकर यांनी आभार मानले. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सीएमए अर्पिता फेगडे, सीएमए मयूर निकम तसेच दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या नाशिक चॅप्टरचे सर्व व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


