अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस उपनिरीक्षक विलास जामनेकर व पोलीस हवालदार अजय सरोदे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवारी (दि. ३०) पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या दालनात कौटुंबिक वातावरणात पार पडला.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस महासंचालकांचे शुभेच्छापत्र व सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पेन्शन ऑर्डर आणि सेवानिवृत्ती प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त अंमलदारांच्या पत्नीला साडी व कुंडीतील रोपटे देण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त ओला यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांच्या प्रदीर्घ सेवेला शुभेच्छा देत, त्यांच्या अनुभवाचा लाभ भविष्यातही पोलीस विभागाला मिळत राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. निवृत्तीनंतरचे जीवन सुदृढ आणि आनंदी जावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या निधीची गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची विश्वासार्हता तपासूनच आर्थिक नियोजन करावे, असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला. शासकीय सुविधा किंवा इतर बाबींमध्ये अडचण निर्माण झाल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
पदोन्नत पोलिसांचा कुटुंबीयांसमवेत पिपिंग सोहळा
याच कार्यक्रमादरम्यान पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस नाईक ते पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांचा पिपिंग सेरेमनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. पदोन्नतीनंतर जबाबदाऱ्या वाढल्या असून, कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत कनिष्ठांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही पार पाडावी, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदोन्नत पोलिसांना सांगितले. पुढील सेवाकाळासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ शाम घुगे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) दिलीप वडगावंकर, पोलीस निरीक्षक (कल्याण शाखा) सतीश पाटील, प्रशासकीय अधिकारी सविता ठेवले यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार, त्यांचे कुटुंबीय तसेच अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.


