पुणे , राजन शेळके (प्रतिनिधी) : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या गणरायाला आज (शुक्रवारी) मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जात आहे. आरतीचे स्वर, फुलांनी सजलेले रथ आणि ढोल-ताशांचा गजर यामुळे विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात रंगली आहे.
शिस्तबद्ध आणि मोठ्या थाटात निघणाऱ्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीकडे जगभरातील गणेशभक्तांचे लक्ष लागलेले असते. गेल्या वर्षी ही विसर्जन मिरवणूक तब्बल ३२ तास २६ मिनिटे चालली होती. यंदाच्या गणेशोत्सवात डीजेविरोधात पुणेकरांनी रोष व्यक्त केल्याने मिरवणुकीदरम्यान आवाजाच्या मर्यादेकडेही लक्ष दिले जात आहे. चार प्रमुख रस्त्यांवरून ६३८ गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
गणरायाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस आणि महापालिकेने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तसेच विसर्जन मार्गावर यंत्रणेद्वारे आवाजाची पातळी मोजली जात आहे. मात्र, या उपाययोजनांमुळे यंदाची मिरवणूक वेळेत संपेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


