आता निर्णय तरुणांनीच घ्यायचा आहे!

-राज माहोरे ✍️

तरुणांनी राजकारणात यावे पण कुणाच्या सावलीत उभे राहण्यासाठी नव्हे; स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी!
मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढण्यापेक्षा एखाद्या बेरोजगार तरुणाच्या हाताला काम द्या. सोशल मीडियावर स्वतःच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा गावातील एखादा प्रश्न सोडवा. वाढदिवसाला बॅनर लावण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी उभे रहा. सभा, घोषणा आणि गर्दी जमविण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि त्याच्या समाधानासाठी प्रशासनाच्या दारात ठामपणे उभे रहा.
राजकारणात प्रवेश करायचा असेल तर आधी स्वतःला घडवा.
पदासाठी धावण्यापूर्वी पात्रता निर्माण करा.
तिकिटासाठी लॉबिंग करण्यापूर्वी जनतेचा विश्वास मिळवा.
नेत्याच्या जवळ जाण्यापूर्वी जनतेच्या जवळ जा.
आणि सत्ता मिळवण्यापूर्वी सत्तेची जबाबदारी समजून घ्या.
जात, धर्म, पक्ष, गट आणि घराण्याच्या चौकटीत स्वतःला बंदिस्त करू नका. संविधान वाचा. महापुरुषांचे विचार वाचा. गावातील प्रश्न समजून घ्या. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सुरक्षा, उद्योग आणि सामाजिक न्याय यावर अभ्यास करा.
झेंडा कोणताही असो; पण हातातला झेंडा माणुसकीपेक्षा मोठा होऊ देऊ नका.
आंदोलन करा पण संविधानाच्या चौकटीत.
संघर्ष करा पण द्वेष न करता.
आवाज उठवा पण सत्यासाठी.
सत्ता मागा पण जनतेच्या सेवेसाठी.
कारण तरुणाच्या हातात दगड असेल तर एक काच फुटेल; पण त्याच हातात पुस्तक, संविधान आणि परिवर्तनाची मशाल असेल तर संपूर्ण पिढीची दिशा बदलू शकते.
आजच्या तरुणाने ‘भाऊ’ किंवा ‘दादा’ म्हणून ओळख मिळवण्यापेक्षा ‘काम करणारा माणूस’ म्हणून ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे.
आता कुणाच्या नावावर राजकारण करण्याची वेळ नाही.
कुणाच्या घराण्याच्या वारशावर भविष्य उभे करण्याची वेळ नाही.
कुणाच्या मागे गर्दी म्हणून उभे राहण्याचीही वेळ नाही.
आता स्वतःला घडवण्याची वेळ आहे.
आता प्रश्न विचारण्याची वेळ आहे.
आता अभ्यास करण्याची वेळ आहे.
आता जनतेमध्ये उतरण्याची वेळ आहे.
आणि सर्वांत महत्त्वाचे आता काम करून दाखवण्याची वेळ आहे!
कारण उद्याचा नेता तोच असेल, जो आजपासून जनतेच्या दुःखात उभा राहील.
राजकारणाच्या बाजारात स्वतःची किंमत लावू नका;
जनतेच्या विश्वासात स्वतःची किंमत निर्माण करा!
नाहीतर इतिहास तुमच्या हातातील झेंडा लक्षात ठेवणार नाही
तो तुमच्या काळात तुम्ही समाजासाठी काय केले, एवढेच लक्षात ठेवेल.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

एकता दिवस : सरदार पटेलांचा वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे आव्हान

राज माहोरे पत्रकार ✍️  राष्ट्रीय एकता ही केवळ नकाशावर सीमा आखून सुरक्षित होत नाही, तर विविध क्षेत्रांतील लोकांमध्ये सामायिक सामाजिक-राजकीय जाणिवेवर अवलंबून असते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रादेशिक आकांक्षा आणि बदलत्या सामाजिक अपेक्षांच्या…

दिवाली के दीये जलेंगे, लेकिन सूखे खेतों का अंधेरा कौन मिटाएगा?

दिवाली यानी खुशियों का त्योहार। घरों में साफ-सफाई, बाजारों में रौनक, मिठाइयों की खुशबू और शाम होते ही दीयों की जगमगाहट। हर कोई चाहता है कि इस दिवाली उसका घर…