अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत आयोजित १० दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या (EDP) प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात झाली. नवउद्योजक महिलांना व्यवसायाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी, त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित व्हावा आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता यावीत, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
नेवासा येथील परशुराम महिला मंडळाच्या अध्यक्षा साधनाताई मुळे यांच्या शुभहस्ते या १० दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अमृत आरिवर्क, अमृत अन्नपूर्णा, अमृत इमिटेशन ज्वेलरी, अमृत फॅशन-ब्युटी पार्लर प्रशिक्षण, ‘अमृत पेठ–थेट बाजारपेठ’ आणि अमृत ई-कॉमर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा उद्योग केंद्रातील CMEGP योजनेचीही माहिती देण्यात आली. प्रशिक्षणासाठी श्री स्वामी समर्थ क्लासेसच्या संचालिका मेघाताई परदेशी यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणात एकूण १६ महिला लाभार्थींनी नोंदणी करून सहभाग घेतला आहे. प्रमुख मान्यवर साधनाताई मुळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना अमृत संस्थेच्या योजनांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. तसेच लक्षित गटातील महिलांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. अमृत मित्र शरद क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. या लक्षित गटातील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच अमृत संस्थेचे संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्स पाहावेत, असे आवाहन व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले.


