अहिल्यानगर ,राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोतुळ तालुका अकोला येथील प्राचीन व नवसाला पावणाऱ्या श्री वरदविनायक देवस्थानात श्री गणपती बाप्पाच्या आगमना निमित्ताने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे ठीक ६ वाजता ऋषिपंचमीच्या दिवशी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते. शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
श्री गणेशाची उपासना ऐक्य, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि सामूहिक कार्यक्षमता वाढविणारी असल्याच्या भावनेतून या सामुदायिक पठणाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजता शंखनाद व ओंकाराच्या गजराने कार्यक्रमास सुरुवात झाली. शांत पहाटेच्या वातावरणात शेकडो भाविकांच्या मुखातून एकाच वेळी उमटलेला अथर्वशीर्षाचा मंत्रघोष आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष यामुळे मंदिर परिसर अक्षरशः गणेशमय झाला. ‘हरिः ॐ नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि।’ या मंत्रोच्चाराने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. एका सुरात झालेल्या सामुदायिक पठणामुळे उपस्थित भाविकांना सामूहिक भक्तीचा अनोखा अनुभव मिळाला. अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व सौ. प्रज्ञा भाटे, विद्या परशुरामी, द्वारका पोखरकर, वर्षा नेवासाकर यांनी केले. पठणानंतर सौ. व श्री. देवानंद पोखरकर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी श्री वरदविनायक देवस्थानच्या वतीने अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी पोखरकर दाम्पत्याचा सन्मान केला. व देवस्थानच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कामाची माहिती उपस्थितांना दिली.
ऋषिपंचमीच्या निमित्ताने महिलांनी ऋषींचे पूजन केले. सौ. विद्या परशुरामी यांनी पोथीवाचन केले. ग्रामीण भागात पहाटेच्या वेळीही शेकडो भाविकांनी लावलेली उपस्थिती आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक व सामाजिक स्वरूप प्राप्त झाले. यावेळी डॉ. सुभाष सोमण, डॉ. कपिल कातोरे, सुभाष घाटकर, अनिल पाठक, बाळासाहेब पोखरकर, संभाजी पोखरकर, विशाल बोऱ्हाडे, कुलदीप नेवासकर, विनय समुद्र, अजित आरोटे, अविनाश गिते, सागर सोनुले, निलेश घोडे, प्रबोध भाटे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाला दरवर्षी मिळणारा वाढता प्रतिसाद हा कोतूळच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारा ठरत आहे.


