मुंबई, गोविंद येतयेकर ( माध्यम प्रमुख ) : ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेतून काम करताना ‘जनसेवा हीच प्रभू सेवा’ हा मंत्र आणि जनसहभागातून 2047 मध्ये विकसित भारताची निर्मिती हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आदी नेते उपस्थित होते. भाजपा, सहकारी पक्ष, संपूर्ण एनडीए कुटुंब, स्वयंसेवी संघटना आणि देशातील जनतेच्या सहभागातून हे अभियान राबवण्यात येणार आहे. 17 सप्टेंबर हा नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस असून, यापूर्वी गुजरात आणि त्यानंतर देशभरात सेवा सप्ताहाच्या माध्यमातून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जात होता. यावर्षी मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्षे पूर्ण होत असल्याने व्यापक स्वरूपात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार असल्याचे शाह यांनी सांगितले.
हे अभियान प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, जिल्हा, लोकसभा व विधानसभा क्षेत्र तसेच बूथ पातळीपर्यंत नेण्यात येणार आहे. या माध्यमातून मोदी यांच्या 25 वर्षांच्या सेवायात्रेची उद्दिष्टे, सिद्धी आणि आगामी काळातील संकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. सेवेला संस्कारात आणि संघटनेला जनसहभाग व जनकल्याणाचे माध्यम बनवण्याच्या उद्देशाने अभियानाची रचना करण्यात आली आहे.अभियानांतर्गत ‘सेवा दिवस’, ‘माझ्या स्वप्नातील भारत’, ‘अंगण मिलन सेवा’, ‘सेवा कथा’, ‘सेवा ज्योती कलश यात्रा’, ‘वडनगर-वाराणसी सेवा यात्रा’, ‘सेवेतील माझे योगदान’, ‘सेवा सेतू अभियान’, ‘सेवेचे रंग, राष्ट्रासंगे’, ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ आणि ‘सुशासन संवाद’ यांसह विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ‘सेवा दिवस’मध्ये रक्तदान, दीपप्रज्वलन आणि जनआभार कार्यक्रमांचा समावेश असेल. ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर देशव्यापी चित्रकला व भाषण स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘अंगण मिलन सेवा’च्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि आशा दीदींचा सन्मान करण्यात येणार असून, पोषण, आरोग्य आणि महिला योजनांची माहिती देण्यात येईल.
‘सेवा कथा’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांमुळे जीवनात सकारात्मक बदल झालेल्या नागरिकांच्या कथा देशासमोर आणल्या जाणार आहेत. ‘सेवा ज्योती कलश यात्रा’च्या माध्यमातून विकसित भारताचा संकल्प करण्यात येणार आहे. ‘वडनगर-वाराणसी सेवा यात्रा’ अंतर्गत वडनगर ते वाराणसी आणि वाराणसी ते वडनगर अशा यात्रा काढण्यात येणार असून, विविध पवित्र नद्यांच्या पाण्याने हटकेश्वर महादेव आणि काशी विश्वनाथ यांचा जलाभिषेक करण्यात येणार आहे. ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या माध्यमातून युवक, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट नवोन्मेषकांना जोडण्यासाठी पाच प्रमुख प्रादेशिक नवोन्मेष स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. ‘सुशासन संवाद’ हा कार्यक्रम 17 ऑक्टोबर रोजी देशभरात चार ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना शाह यांनी या कालावधीत देशात आणि गुजरातमध्ये पायाभूत सुविधा, दारिद्र्यनिर्मूलन तसेच लोकशाही व्यवस्थेत अनेक बदल झाल्याचे सांगितले. 2014 पूर्वी देशाचे राजकारण भ्रष्टाचार, जातिवाद आणि परिवारवादाने ग्रस्त होते, तर 2014 ते 2026 या कालखंडात देश ‘पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स’च्या दिशेने पुढे गेला असल्याचा दावा त्यांनी केला. देशाच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करताना भारत ‘फ्रॅजाइल फाइव्ह’मधून ‘टॉप फाइव्ह’मध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या तिमाहीत 7.8 टक्के जीडीपी वाढीसह मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वाधिक वेगाने पुढे जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कलम 370, नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील प्रश्नांबाबतही गेल्या 12 वर्षांत मोठे बदल झाल्याचा दावा शाह यांनी केला. तसेच 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर आणल्याचे त्यांनी सांगितले. 2047 मध्ये भारत प्रत्येक क्षेत्रात जगात नंबर वन आणि विकसित देश बनवण्याचा संकल्प देशातील जनता आणि युवा वर्गाने केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करताना 44 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांचा खर्च सरकारकडून दिला जात असल्याचे, 16 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचल्याचे, 13 कोटी घरांमध्ये शौचालये बांधल्याचे, 11 कोटी घरांमध्ये उज्ज्वला गॅस कनेक्शन दिल्याचे आणि 4 कोटी गरीबांना घरे मिळाल्याचे शाह यांनी सांगितले. तसेच 7 कोटी घरांमध्ये वीज पोहोचवण्यात आली असून, 3 कोटींपेक्षा अधिक महिलांना स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून ‘लखपती दीदी’ बनवण्याचे काम झाल्याचे त्यांनी नमूद केले.


