तिवसा , राज माहोरे (प्रतिनिधी) : तिवसा शहरासह तालुक्यात नैसर्गिक संकटे, अल्प पाऊस, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या जिवाभावाच्या सर्जा-राजाप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम राखत शेतकऱ्यांनी वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांचा सन्मान केला. त्यामुळे तिवसा शहरात ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि शेतकरी जीवनाचे भावनिक दर्शन घडले.
वर्षभर शेताच्या मातीत राबणारा, उन्हा-पावसाची तमा न बाळगता बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मशागत करणारा शेतकऱ्याचा जिवाभावाचा साथीदार म्हणजे सर्जा-राजा. या कष्टकरी सोबत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना आकर्षक पद्धतीने सजविले होते. रंगीबेरंगी झुली, गोंडे, शिंगांना दिलेला साज आणि अंगावरील रंगरंगोटीमुळे बैलजोड्या विशेष आकर्षण ठरत होत्या. तिवसा पोलीस स्टेशन कार्यालयाजवळ दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळ्याचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला. सजविलेल्या बैलजोड्या ढोल-ताशांच्या गजरात सोहळास्थळी दाखल होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग घेतला. या ठिकाणी दरवर्षी जपली जाणारी मानाचा घाट फोडण्याची परंपरा विलास गौरखेडे आणि किशोर गौरखेडे यांनी यंदाही कायम ठेवली. मानाचा घाट फोडण्यासाठी बैलजोड्या दाखल होत असताना नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. घाट फोडण्याचा क्षण पाहण्यासाठी आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती.
बैलपोळ्याचा उत्साह लहान मुलांमध्येही पाहायला मिळाला. पोलीस स्टेशन परिसरात विविध प्रकारच्या खेळण्यांची, खाद्यपदार्थांची आणि आकर्षक वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. रंगीबेरंगी खेळण्यांकडे चिमुकल्यांनी मोठी गर्दी केली. पालकांसोबत आलेल्या मुलांनी विविध खेळणी खरेदी करत सणाचा आनंद लुटला. शेतीसमोरील विविध संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असतानाही आपल्या सर्जा-राजाच्या सन्मानात कोणतीही कमतरता राहू नये, याची काळजी घेत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि त्याच्या बैलांमधील जिव्हाळा, प्रेम आणि ऋण व्यक्त करणारा उत्सव असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. दरम्यान, शहर व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. परंपरा, संस्कृती आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा बैलपोळा सण तिवस्यात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


