नागपूर, राजेंद्र पहाडे ( प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती, माहिती साक्षरता, डिजिटल साक्षरता आणि एआय साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ई-पुस्तके, ई-जर्नल्स, आयईईई, एनडीएलआय आणि इतर डिजिटल शैक्षणिक संसाधनांची माहिती देण्यात आली. डिजिटल माध्यमातून शैक्षणिक माहिती कशी शोधावी, तिचा योग्य व सुरक्षित वापर कसा करावा, तसेच ऑनलाइन संसाधनांचा शैक्षणिक आणि संशोधनाच्या दृष्टीने प्रभावी उपयोग कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या माहितीच्या युगात योग्य, विश्वसनीय आणि प्रमाणित माहितीची निवड करणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विश्वसनीय माहितीचे स्रोत ओळखणे, चुकीची अथवा भ्रामक माहिती ओळखणे आणि माहितीची सत्यता पडताळून पाहणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यास आणि संशोधनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व लक्षात घेता, विद्यार्थ्यांना चॅटजीपीटी आणि इतर एआय साधनांचा जबाबदारीने, नैतिक पद्धतीने आणि प्रभावीपणे वापर कसा करावा, याची माहिती देण्यात आली. माहिती शोधणे, विषय समजून घेणे, कल्पना विकसित करणे आणि संशोधनासाठी सहाय्यक साधन म्हणून एआयचा वापर कसा करता येईल, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये नियमित वाचनाची सवय निर्माण करण्यासाठी ‘Read More, Learn More’ या संकल्पनेवर आधारित वाचन प्रेरणा उपक्रम राबविण्यात आला. पुस्तकांच्या वाचनासोबतच डिजिटल वाचनाची सवय विकसित करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल लायब्ररी आणि उपलब्ध ऑनलाइन संसाधनांचा मोबाईल व संगणकाद्वारे वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. संशोधनासाठी योग्य संदर्भ, ई-जर्नल्स, विविध डेटाबेस आणि ऑनलाइन माहिती स्रोतांचा प्रभावी वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. पी. वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. राजेंद्र पहाडे यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरतेची संकल्पना केवळ वाचन-लेखनापुरती मर्यादित न राहता आजच्या एआय साक्षरतेपर्यंत विस्तारली असल्याचे सांगितले. आधुनिक ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे केंद्र न राहता ज्ञान, डिजिटल संसाधने, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “वाचन साक्षरतेपासून डिजिटल व एआय साक्षरतेकडे वायसीसीई ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानविकासासाठी अभिनव उपक्रम.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरती ठाकरे, देवराव काळे, प्रणाली रहाटे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


