अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अहिल्यानगर येथील “कै. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय)” येथे “अमृत युवा ऊर्जा” हा युवकांशी संवाद साधणारा कार्यक्रम पार पडला. यामध्ये एकूण 160 पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच विद्यार्थींनी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. कै. माणिकराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गटनिदेशक श्रीपाद कुलकर्णी यांनी स्वागत केले. संस्थेचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि उद्योजक अमित काळे यांनी प्रास्ताविक केले. ग्राहक पंचायतीचे कोषाध्यक्ष कृष्णा बागडे, निवृत्त नायब तहसीलदार सर्वोत्तम क्षीरसागर, निवृत्त शिक्षिका शलाका रसाळ यांनी युवकांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या ग्राहक संरक्षण कायदा व आपले कर्तव्य आणि हक्क विषयावर मार्गदर्शन केले. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेच्या योजना याविषयी माहिती दिली.
लोकतंत्र मिररचे अहिल्यानगर जिल्हा प्रमुख राधेश्याम कुलकर्णी यांनी युवा पिढीशी व्याख्यानातून संवाद साधताना नवीन युवा Zen-z यांनी राष्ट्रहित जपण्यासाठी अध्ययन करावे, थोर पुरुष आणि समाजसुधारक अशा महान पुरुषांचा अभिमान व त्याची मूल्य अंगीकारावे, असे प्रतिपादन केले. १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी निर्माण करणारे संत ज्ञानेश्वर, सोळाव्या वर्षी पहिला “तोरणा” किल्ला जिंकणारे छत्रपती शिवराय हे जगातील जेन जींचे आदर्श ठरतील. राधेश्याम कुलकर्णी यांच्या प्रभावी वक्तृत्वाने सर्व विद्यार्थी यांची मने जिंकली. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट निदेशक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीपाद कुलकर्णी सर यांनी शेवटी आभार मानत अमृत संस्थेच्या अमृत युवा ऊर्जा या कार्यक्रमाचे कौतुक केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार, हिंदू-वीरशैव लिंगायत व अगरवाल इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


