अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : तिवसा विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोही (नीलगाय), रानडुकरांसह वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. या गंभीर प्रश्नावर माजी मंत्री तथा तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी तसेच उपवनसंरक्षक के. योजना यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली.
शेतकऱ्यांच्या निवेदनातील मागण्यांनुसार, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामा व अर्जाची प्रक्रिया सुलभ व गतिमान करणे, तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलार फेंसिंग मटेरियल पुरविण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही १२ जानेवारी २०२५ पासून संबंधित पोर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. योजना सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी पोर्टल बंद असल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पोर्टल तातडीने सुरू करून पात्र शेतकऱ्यांना सोलार फेंसिंगचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच रोही व रानडुकरांच्या उपद्रवामुळे बाधित गावांमध्ये विशेष गस्त, जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी Rapid Response Team (RRT) प्रभावीपणे कार्यरत करणे, वन विभागामार्फत बाधित शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेऊन नुकसानभरपाई व विविध कुंपण योजनांची माहिती देणे, तसेच संवेदनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. “शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. रोही व रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आता सहन केले जाणार नाही. पुढील सात दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर ठोस व परिणामकारक उपाययोजना सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी यशोमती ठाकूर, हरीश मोरे, पंकज देशमुख, श्रीकांत बोंडे, वैभव वानखडे, गजानन देशमुख, रणजित तिडके, राजू कुऱ्हेकर, अभय देशमुख, शैलेश काळबांडे, सतीश गोटे, आशुतोष देशमुख, डॉ. नरेंद्र निर्मळ, दिलीप सोनवणे, रामचंद्र कांडलकर, गंगाधर श्रीखंडे, अरुणराव तडस, सर्वेश खांडे, हर्षल देशमुख, मुरलीधर डहाणे, अतुल यावलीकर, मनीष धुर्वे, बाबुराव उभाळ, राजकुमार इंगळे, अल्पेश काळबांडे, मनीष भुयार, दीपक पडळकर, शरद तालन, संजय चौधरी, विश्वजित बाखडे, वासुदेव चोपकर, यश करडे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.


