तिवसा, राज माहोरे ( ता. प्रतिनिधी ) : यंदाचा खरीप हंगाम तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच निकृष्ट व कथित बोगस बियाण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यासाठी मोठा आर्थिक खर्च करूनही निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके करपू लागली असून संत्रा बागांनाही फटका बसत आहे. परिणामी तिवसा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी केली आहे.
या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तिवसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. यावेळी नुकसानग्रस्त सोयाबीन पीक तसेच पाण्याअभावी काळवंडलेली संत्री तहसीलदारांना प्रत्यक्ष दाखवून शेतकऱ्यांची बिकट अवस्था प्रशासनासमोर मांडण्यात आली. खरीप हंगामाच्या प्रारंभी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली होती. मात्र बियाणे उगवणीत आलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. दुबार पेरणीसाठी बियाणे, खत, मजुरी आणि मशागतीचा अतिरिक्त खर्च सहन केल्यानंतर आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या तालुक्यातील बहुतांश भागातील सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या टप्प्यावर पाण्याची अत्यंत गरज असताना पाऊस नसल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास यंदाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.
अल्प पावसाचा परिणाम केवळ खरीप पिकांवरच नव्हे तर संत्रा बागांवरही दिसून येत आहे. पाण्याअभावी झाडांवर ताण निर्माण झाला असून फळांची वाढ खुंटण्याची आणि फळगळ होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरीही मोठ्या चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने विशेष पथकाद्वारे पीक पाहणी करावी, तिवसा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र भरपाई जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे तालुकाध्यक्ष हेमंत बोबडे, डॉ. सुभाष तवर, अजय सुरटकर, विलास वावरे, गोपाळराव गौरखेडे, मंगेश पोल्हाड, आकाश लांजेवार, सतीश वानखडे, प्रशांत पांडे, पुरुषोत्तम दाते, अनिल कडव, अंबादास तायडे, भास्कर वानखडे, मधुकर कटणकर, विठ्ठल पडधान, शैलेश कानबाले, संजित भोसले यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


