गरबा-दांडिया म्हणजे धांगडधिंगा नव्हे, हिंदूंची श्रद्धा : शंकर गायकर

संजय राऊतांना विहिंपचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकरांचा सणसणीत पलटवार; हिंदूंच्या श्रद्धा-परंपरांशी तडजोड नाही

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गरबा-दांडिया कार्यक्रमांमध्ये प्रवेश, कार्यक्रमाचे स्वरूप आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरांच्या जतनावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुस्लिम युवक दांडिया खेळण्यासाठी आले तर त्यांना रोखणार नाही किंवा आधारकार्ड मागणार नाही, अशी भूमिका मांडत विश्व हिंदू परिषदेला लक्ष्य केले. या भूमिकेवर विहिंपचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी पलटवार केला.

“गरबा-दांडिया हा तमाशा किंवा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही. तो हिंदूंच्या श्रद्धा, साधना, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेला उत्सव आहे. त्यामुळे या परंपरांचे पावित्र्य आणि शिस्त जपण्याची भूमिका घेतली तर त्याला राजकीय रंग देण्याचे कारण काय?” असा सवाल गायकर यांनी केला.

‘नवरात्र म्हणजे या भूमीची साधना’

नवरात्रोत्सवाचे धार्मिक महत्त्व स्पष्ट करताना गायकर म्हणाले, “नवरात्र ही या भूमीची साधना आहे. हे व्रत नऊ दिवस चालते. या काळात विघ्न निर्माण करणाऱ्या असुरांचा समाचार घेण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे नवरात्राकडे केवळ नृत्य, संगीत आणि मनोरंजनाच्या चौकटीत पाहणे हा या उत्सवाच्या मूळ भावनेचा अपमान आहे.” गरबा-दांडिया कार्यक्रमांसाठी आयोजकांनी प्रवेश, वेशभूषा, वेळ, सुरक्षा आणि शिस्तीबाबत नियम ठरविल्यास त्याला भेदभावाचे स्वरूप देणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “नियम सर्वांसाठी समान असतील आणि त्यामागे कार्यक्रमाची सुरक्षितता, शिस्त व धार्मिक-सांस्कृतिक स्वरूप जपण्याचा उद्देश असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही,” असे गायकर म्हणाले.

‘हिंदूंच्या भावनांना राजकीय रंग नको’

“हिंदूंच्या श्रद्धा आणि परंपरांचा सन्मान करण्याची मागणी केली की त्याला लगेच हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरूप देणे हा राजकीय सोयीचा मार्ग आहे. कोणत्याही समाजाविरोधात द्वेष निर्माण करणे आमचा हेतू नाही; मात्र हिंदूंच्या धार्मिक परंपरांकडे दुर्लक्ष करण्याची अपेक्षाही स्वीकारली जाणार नाही,” असे गायकर यांनी सांगितले. मुंबई सर्वांची असल्याचे मान्य करतानाच प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सर्वसमावेशकतेचा अर्थ कोणत्याही एका समाजाच्या श्रद्धांकडे दुर्लक्ष करणे असा होऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.

‘संघ ही देशभक्तीची नशा’

संजय राऊत यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातील वक्तव्यावरही गायकर यांनी प्रत्युत्तर दिले. “संघ ही देशभक्तीची नशा आहे. ती कोणत्याही येड्या-गबाळ्याला चढत नाही आणि राष्ट्रभक्ताची ती कधी उतरत नाही,” अशा शब्दांत त्यांनी संघाच्या कार्याचा गौरव केला. “विश्व हिंदू परिषदेला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. हिंदू समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रश्नांसाठी आवाज उठवणे हा आमचा अधिकार आहे. हिंदूंच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांच्याशी तडजोड केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच गरबा-दांडियाच्या मुद्द्यावरून राऊत आणि विहिंपमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. आयोजकांनी कार्यक्रमाचे नियम स्पष्टपणे जाहीर करावेत, सर्व सहभागींसाठी समान शिस्त ठेवावी आणि धार्मिक-सांस्कृतिक वातावरण अबाधित राहील याची दक्षता घ्यावी, अशी भूमिका पुढे आली आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…