नांदेड, रवींद्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : नांदेडच्या रंगभूमीला समृद्ध करणारा आणि रसिकांना वैविध्यपूर्ण नाट्यानुभव देणारा कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच कै. डॉ. विश्वास देशमुख दीर्घांक महोत्सव डॉ. शंकरराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडला. तन्मय ग्रुप व लीला आर्ट्स फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित या महोत्सवात मयुरी रवींद्र (मुंबई) लिखित-दिग्दर्शित ‘भिर्रररर’ आणि लेखिका-सादरकर्ती शीतल राऊत यांचे ‘आबा का जाबा का’ हे दोन भिन्न आशयांचे प्रयोग सादर करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. नाथा चितळे यांच्या पुढाकारातून नांदेडच्या रसिकांना या दर्जेदार कलाकृतींचा अनुभव मिळाला.
उद्घाटनप्रसंगी प.पू. खंडू गुरू असोलेकर, मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव राजेश महाराज देगलूरकर, नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षा अपर्णा हृषिकेश नेरलकर, शिबिराचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. नाथा चितळे, शिबिरप्रमुख अक्षत सूर्यवंशी, उपप्रमुख आदित्यराज उदावंत, कार्यक्रमाधिकारी स्नेहा कदम आणि स्त्री संघटक रिया पावडे उपस्थित होते. कै. ज्ञानेश्वर गायकवाड स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून गोविंद शिंदे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी नेरकर यांनी केले.
लोकस्मृती आणि स्त्रीसंघर्षाचे ‘भिर्रररर’
मयुरी रवींद्र लिखित-दिग्दर्शित ‘भिर्रररर’ हा लोकस्मृती, ओव्या, ग्रामीण स्त्रीजीवन आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचे प्रभावी रंगरूप ठरला. जान्हवी मराठे आणि मयुरी रवींद्र या दोनच अभिनेत्रींच्या बहुपदरी अभिनयातून अब्दुल्लाटच्या सामायिक इतिहासापासून शेतकरी स्त्रीच्या संघर्षापर्यंतचा विस्तीर्ण पट रंगमंचावर उलगडला. ओवी ही केवळ लोकपरंपरा न राहता कथानकाची लय, स्त्रीचा अंतःस्वर आणि सामूहिक स्मृतीचे नाट्यतंत्र बनते. हास्य, करुणा, लोकबोली, देहबोली आणि गीत-संवाद यांच्या संगमातून प्रयोगाची नाट्यगती सतत उंचावत जाते. आशाताईंच्या संघर्षातून आर्थिक स्वावलंबनाकडे झालेला प्रवास हा प्रयोगाचा आशावादी उत्कर्षबिंदू ठरला.
दोन अभिनेत्रींच्या अफाट ऊर्जेचा, अभिनयाच्या ताकदीचा आणि रंगमंचावरील जिवंतपणाचा अनुभव नांदेडच्या नाट्यरसिकांना मिळाला. प्रकाशयोजना, संगीत आणि ध्वनीयोजना यांनी नाटकाच्या आशयाला अधिक परिणामकारकता दिली. रंगमंचावरील प्रत्येक तांत्रिक घटक कथानुभवाचा अविभाज्य भाग ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही कलाकारांची ऊर्जा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली आणि नाटक जसजसे पुढे सरकत गेले, तसतसा त्याचा प्रभाव अधिक गडद होत गेला.
डिजिटल वास्तवाचा ‘आबा का जाबा का’मधून वेध
याउलट ‘आबा का जाबा का’ हे आधुनिक मध्यमवर्गीय तरुणीच्या स्वप्नांचा, करिअरच्या संघर्षाचा आणि सोशल मीडियाच्या आभासी जगाचा वेध घेणारे सशक्त एकपात्री नाट्य ठरले. शीतल राऊत यांनी क्लाउनिंग, माइम, योग-ॲक्टिव्हिटी, देहबोली आणि थेट प्रेक्षकसंवादाच्या माध्यमातून एकाच शरीरात अनेक व्यक्तिरेखांचे रंगविश्व उभे केले. रंगमंचावरील टाळ्यांची जागा डिजिटल लाईक्स आणि व्ह्यूज घेत असताना, ‘यश’ म्हणजे नेमके काय, हा प्रश्न विनोदाच्या आवरणातून तीक्ष्णपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला.
डॉ. विश्वास देशमुख यांच्या स्मृतींना अभिवादन
कै. डॉ. विश्वास देशमुख यांच्या डॉक्टर, नट, लेखक आणि कलाप्रेमी अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला या महोत्सवातून अभिवादन करण्यात आले. नेत्ररोगतज्ज्ञ असतानाच लेखक, अभिनेता आणि कलाप्रेमी म्हणून त्यांनी नांदेडच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिलेले योगदान अधोरेखित झाले. त्यांच्या नाट्यदृष्टीला पुढे नेणारे असे उपक्रम नव्या रंगकर्मींच्या जडणघडणीसाठीची महत्त्वपूर्ण सांस्कृतिक गुंतवणूक ठरत असून, नांदेडच्या रंगभूमीला नवी दिशा देण्याचे काम या महोत्सवाने केले.



