शेतकऱ्यांच्या लेकरांची यशोगाथा; शिरजगाव मोझरीत अभिमानाचा सोहळा

चंद्रदीप सोनटक्के सहाय्यक आयुक्तपदी; विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंतांचा गौरव

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी ) : कष्टाच्या रानात घाम गाळणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठत संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. शिरजगाव मोझरी येथील भूमिपुत्र चंद्रदीप अशोकराव सोनटक्के यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षा २०२४ मध्ये दमदार यश संपादन करून सहाय्यक आयुक्तपदाला गवसणी घातली. त्यांच्या या यशामुळे शिरजगाव मोझरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

चंद्रदीप सोनटक्के यांच्या यशाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) भव्य मिरवणूक काढून त्यांच्यासह गावातील विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंतांचा नागरी सत्कार केला. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या चंद्रदीप यांच्या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे. सध्या ते सहाय्यक आयुक्त पदावर रुजू झाले असून त्यांचा अधिकृत प्रशिक्षण कालावधी सोमवार, दि. ७ सप्टेंबरपासून पुणे येथील प्रबोधिनी ट्रेनिंग सेंटरमध्ये सुरू होणार आहे. चंद्रदीप यांच्या यशाचा आनंद गावकऱ्यांनी जल्लोषात साजरा केला. यावेळी केवळ चंद्रदीप यांचाच गौरव न करता २०२३ ते २०२६ या कालावधीत विविध शासकीय सेवेत दाखल झालेल्या गावातील गुणवंत मुला-मुलींचाही नागरी सत्कार करण्यात आला.

यामध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड झालेले संदेश पंडितराव वावरे, सागर राजकुमारराव होले, कल्याणी भास्करराव खोब्रागडे, राहुल अशोकराव भालेराव, सुरज राजेंद्रराव कारमोरे, वृषाली सुरेशराव डफड व महिमा रमेशराव डफड, पोलीस सेवेत दाखल झालेले सुशील दीपकराव तुरकाने व सुरज दिलीपराव वावरे, तसेच शिक्षण क्षेत्रात सेवा देणाऱ्या स्वाती सिद्धार्थ खोब्रागडे, प्रीती सिद्धार्थ खोब्रागडे व तेजस सुरेशराव डेहनकर यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय कोर्ट शिपाई म्हणून निवड झालेले प्रथमेश रुद्रेश्वरराव दाभाडे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेत निवड झालेले कृष्णदीप अशोकराव सोनटक्के, गडचिरोली येथे PSI पदावर रुजू झालेले रोशन अशोकराव राघोर्ते, बँक क्लर्क म्हणून निवड झालेले सुमेध प्रमोदराव मेश्राम आणि एमआयडीसी कर्मचारी राज्य विमा अधिकारी म्हणून निवड झालेले विक्रम पंजाबरावजी मात्रे यांचाही यावेळी नागरी सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक फेटे बांधून गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या भूमिपुत्रांच्या यशाचा आनंद साजरा केला. गावातील विविध चौकांमध्ये नागरिकांनी शाल व श्रीफळ देऊन गुणवंतांचा सन्मान केला. या उत्स्फूर्त स्वागतामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. पंचशील मंडळ, नालंदा बहुउद्देशीय संस्था शिरजगाव मोझरी, समता सैनिक दल महिला मंडळ व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…