अहिल्यानगर राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) ) : विद्यानंदाच्या डी.जे.मुक्त गणेशोत्सव भूमिकेमुळे महाराष्ट्रातील गणेशोत्सवास नवीन दिशा मिळेल काय? पुण्याच्या पेठेतील एक सामान्य नागरिक श्री. विद्यानंद बापट यांनी पुणे महापालिकेतील नागरिकांच्या एका बैठकीत डीजे विरुद्ध अत्यंत प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. आणि म्हणता म्हणता साऱ्या महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळू लागला. श्री. बापट यांनी अस्खलित मराठीतून आणि योग्य जागी योग्य संस्कृत सुभाषितांचा वापर करत मांडलेली भूमिका पुण्यात नेतृत्व करणाऱ्या प्रचलित मंडळींना बाउन्सर प्रमाणे अत्यंत अनपेक्षित होती.
पहिले दोन दिवस श्री. बापट हे आपल्या मुद्याशी प्रामाणिकपणे (म्हणजे सचिन तेंडुलकर प्रमाणे क्रिजमध्ये राहून अत्यंत शास्त्रशुद्ध) बॅटींग करत होते. मात्र मागील दोन दिवसांत त्यांनी क्रिजच्या बाहेर जाऊन चौकार-षटकार मारायला सुरुवात केली. त्यामुळेच आता त्यांना जनक्षोभाला आणि उद्रेकाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. (श्री. बापट यांच्याबाबतीत झालेला मारहाणीचा प्रकार अत्यंत निंदनीय व निषेधार्ह आहे.)
समाजातील एका अत्यंत महत्वाच्या समस्येबाबत श्री. बापट यांना मिळत असलेला सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा लक्षात घेता त्यांनी या महत्त्वाच्या क्षणी संयमाने आपल्या मुद्यापुरते मर्यादित राहून मांडणी केल्यास शासन यंत्रणेवर जनशक्तीचा दबाव वाढेल आणि यानिमित्ताने “डिजेमुक्त गणेशोत्सव” ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल, अशी शक्यता दृष्टीपथात येऊ लागली आहे. मुद्यांवरून सुरु झालेला हा वैचारिक लढाईचा प्रवास गुद्यांपर्यंत येऊन विसर्जित होऊ नये. सुज्ञ पुणेकर या संवेदनशील क्षणी महत्वाची भूमिका बजावतील व महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाला एक नवी दिशा देतील, असा विश्वास वाटतो.


