पुणे, राधेश्याम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवीतून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. श्रीजा संदेश झरेकर हिचा शिक्षक दिनानिमित्त श्री गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट, पुणे येथे गुणगौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते श्रीजाचा सत्कार करण्यात आला.
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, सदाशिव पेठ, पुणे येथील विद्यार्थिनी असलेल्या श्रीजाने मिळवलेल्या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे, शिक्षकांचे आणि पालकांचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या गुणगौरव समारंभास जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल बाबा जगदाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीजाच्या या यशामुळे ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला नवा मानाचा तुरा लाभला आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


