पुणे : जन्माष्टमीच्या उत्साहात पुणेकरांना पुन्हा एकदा दहीहंडीच्या थराराचा अनुभव घेता येणार आहे. सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने शनिवारी (दि. ५) पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेलबाग चौकाजवळील मंडळाच्या पारंपरिक उत्सवस्थळी हा सोहळा रंगणार आहे.
या उत्सवाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे तब्बल ४० फूट एलईडी वॉल. या भव्य स्क्रीनवर गोपाळभक्तांना राधाकृष्ण लीलेचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे दहीहंडीच्या उत्सवासोबत भक्तिमय वातावरणाचाही अनुभव उपस्थितांना घेता येणार आहे. शनिवारी दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत नादब्रम्ह ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टच्या वादकांकडून पारंपरिक ढोल-ताशांचे वादन करण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमल्यानंतर रात्री ८.३० वाजता दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकाला ५१ हजार रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गोविंदा पथकांसह पुणेकरांमध्येही या उत्सवाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. “पुण्याच्या दहीहंडी उत्सवातील प्रमुख आकर्षण” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने गोपाळभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले आहे.


