अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक विभागात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने आपल्या विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी उत्सवाला स्थगिती देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी नवाथे चौक येथे होणारी भव्य दहीहंडी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक उपक्रम रद्द करण्यात आले असून, त्यासाठी नियोजित सुमारे ५० लाख रुपयांचा निधी पीडित कुटुंबे, गरजू नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग आणि बेरोजगार युवक-युवतींच्या मदतीसाठी समर्पित करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर तसेच माजी खासदार व भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या नवाथे चौकासह परतवाडा, धारणी, अंजनगाव सुर्जी आणि तिवसा येथील सर्व नियोजित दहीहंडी कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. दुर्घटनेत आपल्या नवजात बालकांना गमावलेल्या पूजा स्वप्नील बोरंगे, गायत्री प्रफुल्ल चोपडे आणि किरण गंगाराम बेठेकर या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा हे स्वतः त्यांच्या घरी जाऊन प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहेत. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार असून संबंधित महिलांना शिलाई मशीनचे वाटपही करण्यात येणार आहे.
दुर्घटनेच्या काळात जीवाची पर्वा न करता नवजात बालकांचे प्राण वाचविण्यासाठी धाडसाने पुढे आलेल्या परिचारिका, सुरक्षा रक्षक आणि इतर सेवाभावी कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना आर्थिक मदतीसह गौरविण्यात येणार असून त्यांच्या सेवाभावाला मानवंदना दिली जाणार आहे. स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार रवी राणा यांनी दिले आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत मागील एका महिन्यात जन्मतः अंध, दिव्यांग किंवा कर्णबधिर जन्मलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष सहाय्य जाहीर करण्यात आले आहे. स्वर्गीय महेंद्र शिरसाट आणि स्वर्गीय लोकेश म्हाला यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सायकली, शालेय शुल्कासाठी आर्थिक मदत तसेच गावागावातील वाचनालये आणि अभ्यासिकांना आवश्यक शैक्षणिक व संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना आवश्यक साहित्य, कर्णबधिरांना कर्णयंत्रे, बेरोजगार युवक-युवतींना रोजगारासाठी लोटगाड्या व व्यवसाय साहित्य, तर विधवा व निराधार महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. मेळघाटातील आदिवासी भागातील गरजू कुटुंबांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवानी ईश्वर जावरकर यांच्या कुटुंबाला ५१ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबे, तिवसा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले चरणदास इखे यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रुपयांची मदत, तसेच विविध अपघातग्रस्त व संकटग्रस्त कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून नवाथे चौक येथे रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, बालरोग तज्ज्ञांमार्फत बालकांची तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप आदी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला असला तरी परंपरा कायम ठेवण्यासाठी सकाळी १० वाजता बालगोपालांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण पूजन करून अत्यंत साध्या पद्धतीने दहीहंडी फोडण्यात येणार आहे. तसेच बालकांसाठी राधा-कृष्ण वेशभूषा व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या जल्लोषाऐवजी सामाजिक संवेदनशीलतेला प्राधान्य देत युवा स्वाभिमान पार्टीने घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, “उत्सवापेक्षा माणुसकी मोठी” हा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पत्रकार परिषदेला उपस्थित
युवा स्वाभिमानचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे, मार्गदर्शक सुनिल राणा, जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, राष्ट्रीय सचिव जयंतराव वानखडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष शैलेंद्र कस्तुरे, राष्ट्रीय सल्लागार प्रा. अजय गाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड. नंदेश अंबाडकर, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, संजय भारसाकडे, प्रा. सतीश खोडे, प्रा. संतोष बनसोड, प्रा. ओम मुंदे उपस्थित होते. यावेळी नाना आमले – उपमहापौर, सचिन भेंडे – मनपा गटनेते, युवा स्वाभिमान पार्टी, दीपक सम्राट – स्थायी समिती सदस्य, सौ. प्रियंका भूषण पाटने – स्थायी समिती सदस्य, अँड. प्रिती रेवणे – शिक्षण सभापती, सुमती ढोके – उपसभापती, शहर सुधार समिती, किशोर जाधव – मिनी महापौर, प्रशांत वानखडे – स्थायी समिती सदस्य उपस्थित होते.
तसेच मिरा कांबळे, गौरी मेघवानी, महेश मुलचंदानी, नंदा सावदे, अजय जयस्वाल, अर्चना पांडे, रजनी डोंगरे, योगेश विजयकर हे नगरसेवक-नगरसेविका तसेच संजय हिंगासपुरे – स्वीकृत नगरसेवक, नितीन बोरेकर, गंगाधर आवारे, किशोर पिवाल, बाळू इंगोले, विनोद गुहे, ज्योती सैरीसे आदी उपस्थित होते.


