अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : मेंढपाळ समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आले. आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून आंदोलकांची चर्चा घडवून आणली. शासन मागण्यांबाबत सकारात्मक असून, ३ सप्टेंबरपर्यंत मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर मेंढपाळ बांधवांनी उपोषण मागे घेतले.
मेंढपाळ समाजाने गत महिन्यात १६ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले होते. त्यावेळी मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार बैठक झाली; मात्र ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मेंढपाळ बांधवांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले होते. मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू असूनही प्रशासनाकडून तोडगा निघत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी होती.
दरम्यान, सोमवारी आमदार बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. शासन मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी ३ सप्टेंबरपर्यंत मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याचे तसेच मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले.
मेंढपाळ समाजाच्या प्रमुख मागण्या
वनक्षेत्रात पारंपरिक पद्धतीने मेंढ्या-शेळ्या चारणाऱ्या मेंढपाळांना विनाकारण अडवू नये आणि त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करू नये, अशी प्रमुख मागणी आहे. वन विभागाने दाखल केलेल्या गुन्हे व दंड प्रकरणांचा पुनर्विचार करून न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मेंढपाळांसाठी चराई मार्ग, पिण्याचे पाणी आणि मुक्कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पशुसंवर्धन विभागामार्फत नियमित लसीकरण, मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व पशुवैद्यकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आहे.
मेंढपाळ समाजासाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना, आर्थिक सहाय्य, विमा संरक्षण, पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण, शिक्षण व शासकीय नोकरीत स्वतंत्र आरक्षण, स्वतंत्र मेंढपाळ विकास महामंडळाची स्थापना आणि विशेष विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. साथीचे रोग, विषबाधा, नैसर्गिक आपत्ती किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मेंढ्यांचा मृत्यू झाल्यास तात्काळ पंचनामा करून संबंधित मेंढपाळांना योग्य आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी आहे. या मागण्यांसाठी धनगर युवा नेते तथा उपोषणकर्ते डॉ. अर्जुन महानर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. आमदार बच्चू कडू यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
खेचर, मेंढ्या घेऊन मुख्य रस्त्यावर ठिय्या
मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही शासन-प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या मेंढपाळ बांधवांनी सोमवारी सकाळी उपोषणस्थळी खेचर आणि मेंढ्या आणून मुख्य रस्त्यावर ठिय्या दिला. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
मेंढपाळ बांधव शेळ्या-मेंढ्या घेऊन शासकीय कार्यालयात प्रवेश करण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी मुख्य रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. नृत्य, पारंपरिक वाद्ये आणि घोषणांनी आंदोलनस्थळी वातावरण दणाणून गेले.


